Bagayati Sheti | बागायती शेती

वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.
हंगामी बागायती शेती : पाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असल्याने त्याचा स्रोतच जर हंगामी असेल तर हंगामी बागायती शेती पद्घतीचा अवलंब करावा लागतो. यात सामान्यतः खरीप आणि रब्बी या हंगामांत संरक्षित पाण्याच्या पाळ्या देऊन पिके घेतली जातात. खरीप हंगामातील पिके बहुतांश पावसाच्या पाण्यावर येतात आणि रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध पाण्याचा संरक्षित म्हणून वापर करुन पीक घेतले जाते.

बारमाही बागायती शेती : या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.
बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात.

पिकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरुन बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment