हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत" असे म्हणतात.
हिरवळीच्या खतांचे प्रकार :
हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .
१) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग,मिश्र किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात. या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार, चवळी,धैंचा, मूग, मटकी, मेथी, लाख, मसूर, वाटाणा, उडीद, कुळीथ, सेंजी, शेवरी, लसुणघास, बरसीम या पिकांचा समावेश असतो.
२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय. हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभुळ, टाकळा, कर्णिया, ऎन, किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाळवूनत्यांच्या हिरव्या पानांचा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .
हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती :
१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे. ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात. ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे. या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत. ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल.
२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी. कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे. नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी. हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल.
४) शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट बाय ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल.
५) कपाशीच्या रांगामध्ये तूणधान्य,शेंगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन ह्या पिकांच्या कापणी नंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे, उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर ह्याचा परिणाम दिसून येतॊ . सोयाबिन, तूर व ज्वारी सोबत पेरून, सोयाबीन हिरवळखत म्हणून वापरता येईल; ज्वारी व तूर ह्यांचे उत्पादनात वाढ होईल.
हिरवळीच्या खतांची पिके :
ताग :ताग (बोरू) हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढणारे हिरवळीचे पीक आहे. पेरणी झाल्यानंतर पाच ते सहा आठवड्यांनी गाडल्यानंतर हेक्टरी सर्वसाधारणपणे १७.५ ते २० टन सेंद्रिय खत मिळते. त्यापासून ६० ते १००किलो प्रतिहेक्टरी नत्र प्राप्त होते. त्याचबरोबर इतर मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्येही पुढील पिकांना उपलब्ध होतात. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत तागाची योग्य वाढ होत नाही.
धैंचा : हे तागापेक्षा काटक हिरवळीचे पीक आहे. या वनस्पतीच्या मुळावर तसेच खोडावरही गाठी निर्माण होतात. त्यामध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदल वनस्पतींपेक्षा ५ ते १०टक्के जास्त आहे. पाणी साचून राहणाऱ्या दलदलीच्या, कोरड्या किंवा क्षारयुक्त चोपण जमिनीतसुद्धा धैंचा पीक वाढू शकते. पावसाळ्याच्या सुरवातीला हेक्टरी २५ ते ४०किलो बियाणे पेरावे. पीक सहा ते सात आठवड्यांत ९० ते १००सें.मी. उंचीचे वाढल्यानंतर जमिनीत नांगराने गाडावे. या कालावधीत धैंचापासून १८ ते २० टन इतके हिरव्या वनस्पतीचे उत्पादन मिळते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६इतके असून, मुळावरील व खोडावरील गाठींतील जिवाणूंमुळे प्रतिहेक्टरी १५०कि.ग्रॅ.पर्यंत स्थिर केले जाते.
द्विदलवर्गीय पिके : मूग, चवळी, उडीद, सोयाबीन, मटकी, कुळीथ, गवार ही पिके फुलोऱ्याआधीसुद्धा गाडून चांगला फायदा मिळू शकतो. मात्र या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर सर्व अवशेष जमिनीत गाडल्यास त्याचा चांगला फायदा होतो. या पिकांचे अवशेष जमिनीत लवकर कुजतात.
हिरव्या कोवळ्या पानांची खते : शेतात बांधावर किंवा पडीक जागेवर गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ, मोगली, एरंड पिकांची लागवड करून त्यांची कोवळी पाने अथवा कोवळ्या फांद्या तोडून जमिनीत मिसळावीत. या हिरवळीच्या पिकांचा एक मुख्य फायदा म्हणजे या पिकांसाठी ज्या जमिनीत मुख्य पीक घ्यावयाचे आहे, तेथे हिरवळीच्या पिकाच्या लागवडीसाठी वाट बघावी लागत नाही. केवळ बांधावर या पिकांची लागवड करून त्यांच्या कोवळ्या फांद्या, पाने तोडून ते मुख्य पिकातील जमिनीवर मिसळता येतात. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची शक्यता नसते.
गिरिपुष्प : गिरिपुष्प हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात वाढणारे हिरवळीचे पीक आहे. या झाडाच्या पानांमध्ये ८.५टक्के कर्ब, ०.४०टक्का नत्र असते. या वनस्पतीची बांधावर लागवड करून त्याची पाने वरचेवर जमिनीत मिसळता येतात. याशिवाय इतर वनस्पतींच्या तुलनेत या पिकाच्या पानात नत्राचे प्रमाण भरपूर असते.
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके/वनस्पती व त्यातील नत्राचे प्रमाण :
पिकाचे नाव | नत्राचे शेकडा प्रमाण |
ताग | ०.४६ |
चवळी | ०.४२ |
गवार | ०.४९ |
सुर्यफुल | ०.४५ |
हरभरा | ०.५० |
सोयाबीन | ०.७१ |
उडीद | ०.४७ |
मटकी | ०.३५ |
लसून घास | ०.७३ |
करंज | २.६१ |
अंजन | १.४२ |
ऐन | २.०४ |
भेंड | २.९० |
गिरिपुष्प | २.७४ |
हिरवळीच्या खतांचे फायदे :
१) हिरवळीच्या खतांमध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते, त्यामुळे मातीला काळा रंग येतो.
२) हिरवळीच्या खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणुंना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. परिणामी जिवाणुंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.
३) लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदचे प्रमाण आणी अॅझोटोबॅक्टरसारख्या जिवाणुंचे प्रमाण वाढते.
४) जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचे प्रमाण वाढते.
५) जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते.
६) सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून न राहता. त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणीधारण करण्याची क्षमता वाढते.
७) द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.
८) क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.
९) हिरवळीच्या खताची पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात व जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.
१०) हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.
हिरवळीचे खत तयार करताना घ्यावयाची काळजी :
· पिक लवकर भरपूर वाढणारे असावे.
· पिक रसरशीत व तंतूचे असावे ज्यायोग्य ते लवकर कुजते.
· पिक कोणत्याही जमिनीत वाढणारे व शक्यतो शेंगाकुलीतील असावे.
· पिकामुळे जमिनीवर वाईट परिणाम होऊ नये.
· पिक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ते जमिनीत गाडावे.
· पिकला सिंचनाची सुविधा असावी, म्हणजे पिक साधण्यास मदत होते.
(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता लेखक व प्रकाशक जबाबदार राहणार नाही.)
- डॉ. कु. सारिका वांद्रे, कोल्हापूर
(एम.टेक., पी.एच.डी. मृदा व पाणी संधारण)
सहयोगी संशोधक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
(एम.एस.सी., पी.एच.डी. होर्टी. फळशास्त्र)
सहयोगी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
----------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ. वरील माहितीवाचून, संकलन करून ती लेखाच्या स्वरूपात मांडत असतो... त्या लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना आपल्या कायद्यात "इंटेलेक्चुअलप्रोपर्टी राईटस् (Intellectual Property rights)" या रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे... तेव्हा कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना, लेखालास्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना काळजी घ्या... मूळ लेखक कॉपीराईट (Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ. कलमांखाली आपल्यावर कारवाईकरू शकतो... या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या प्रकारची शिक्षा होवू शकते...----------------------------------------------------------------------------------------------------------------
0 comments:
Post a Comment