स्वयंपाकघरात प्राधान्याने वापरल्या जाणाऱया कढीपत्त्याचे अनेक औषधी गुण आता समोर आले आहेत. जेवण चविष्ट बनविण्यासोबतच, आरोग्य चांगले राहण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो. कढीपत्त्यामुळे पोटांच्या विकारांपासून मुक्तता मिळते. यात काल्शियम,, फॉस्फरस लोह, 'क' आणि 'अ'जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. कढीपत्ता हे आरोग्याच्या अनेक तक्रारांवर रामबाण उपाय असलेले गुणकारी औषध असल्याचे स्पष्ट झाले आहे. कढीपत्त्याचे सेवन केल्याने डोकेदुखी, तोंड येण्यावर मात करता येते. यामुळे केसांच्या समस्येपासून सुटका होत असून केस पांढरे होण्याचे प्रमाण देखील कमी होते. कढीपत्त्यामुळे पचन क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. रोज कढीपत्ता चावून खाल्याने लठ्ठपणा कमी होतो. कडीपत्त्याची पाने, लिंबूचा रस आणि साखर मिसळून सेवन केल्यास उलटय़ा थांबतात. यकृत आणि मधुमेहाच्या रूग्णांसाठी कढीपत्ता खूप फायद्याची ठरतो. नजरेसाठीदेखील कढीपत्ता खूप लाभदायी आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठीदेखील कढीपत्ता लाभदायक आहे.कढीपत्त्याने कर्करोग होत नाही. मधुमेहाने प्रमाण कमी होते. कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी होते. याचा पाला पोटात गेल्यावर फायबर असल्याने व कॅन्सर विरोधक तत्व यात असल्याने कॅन्सरला प्रतिबंध होतो.
जमीन :
कढीपत्त्याची लागवड हलक्या जमिनीपासून ते काळ्या, कसदार जमिनीत करता येते, मात्र पाण्याचा निचरा न होणा-या जमिनीत याची लागवड करू नये. मुरमाड,खडकाळ जमिनीतही कढीपत्ता बऱ्यापैकी वाढतो. त्यामुळे देशभराच्या पडीक जमिनीतही मध्यम पाण्याची सोय असेल तर सलग कढीपत्त्याची शेती करायला हरकत नाही. दिवसेंदिवस शेत जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे तेव्हा कढीपत्त्याची लागवड बांधाने केली तरी १ एक क्षेत्रावरील बांधावरील या कढीपत्त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच मुख्य पिकाचे वाऱ्यापासून (वींडब्रेक) या बांधावरील कढीपत्त्यापासून संरक्षणही करता येते.
हवामान :
समशीतोष्ण ते उष्ण हवामान कढीपत्त्यास पोषक ठरते. तेव्हा दक्षिणेतील सर्व राज्ये व महारष्ट्राभोवतीच्या सर्व राज्यात हे एक आशादायक पीक ठरू शकेल.जाती :
सर्वसाधारण शेतकरी माणसांना डोंगरातील जंगली, स्वस्त व कमी स्वादाचा आणि परसबागेतील स्वादाचा गावरान असे अनुभवाने दिलेले दोन प्रकार माहिती आहेत. तथापि, डीडब्ल्यूडी-१ व डीडब्ल्यू-२ ह्या धारवाड येथील कृषी महाविद्यालयाने अधिक स्वादाच्या जाती विकसित केलेल्या आहेत. त्यातील स्वादयुक्त (इसेन्शिअल ऑईल) प्रमाण ४ ते ५ % असते.
लागवडीची पद्धत :
जमिनीची पूर्व मशागत करून कढीपत्त्याची लागवड करतात. लागवडीचे दोन प्रकार आहेत.
१) बी टोकून : व्यापारी तत्त्वावर लागवड करायची झाल्यास बीपासून अभिवृद्धी करावी. ही पद्धत आंध्रमध्ये पारंपारिक पद्धत आहे. चांगले उत्पादन देणाऱ्या झाडाची पूर्ण पिकलेली फळे घ्यावीत. या फळातून बी काढावे. बी रूजत घालण्यासाठी गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करताना माती, शेणखत व वाळू १ : १ : १ या प्रमाणात मिसळावे. बी पेरल्यानंतर ते सुमारे ३ आठवड्यांनी उगवते.बियांना जर रात्रभर पाण्यात बुडवून ठेवले तर लहान जांभळाच्या आकाराच्या दिसणाऱ्या बियांमधून तिसऱ्या दिवशी बारीक कोंब आल्यासारखे दिसून एका बियातून २ ते ३ रोपे बोहेर पडतात.
२) रोपे लावून : एक वर्ष वयाची रोपे मुख्य शेतात लागवडीसाठी वापरावीत. रोपे १ फूट ते २ फूट उंचीची लावता येतात. त्यासाठी १ फूट बाय१ फूट बाय१ फूट खड्डा पुरे असतो. फुटव्यापासून देखील लागवड करता येते. पावसाळ्याच्या सुरवातीला हे फुटवे खणून काढावेत आणि त्वरित त्यांची लागवड करावी. कढीपत्त्याची स्वतंत्रपणे लागवड करताना ४मीटर बाय ४मीटर अंतरावर ३०सें.मी.बाय ३०सें.मी.बाय ३० सें.मी. आकाराचे खड्डे खणून, त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. या खड्ड्यामध्ये पावसाळ्याच्या सुरवातीला रोपांची लागवड करावी.घनपद्धतीने लागवड करायची झाल्यास दोन रांगांमध्ये 1 मीटर व दोन रोपांमध्ये ३० सें. मी. अंतर सोडावे.
पावसाळ्याच्या सुरवातीला कढीपत्त्याची रोपे लावावीत. जून ते सप्टेंबर अखेर जर लागवड केली, तर रोपे व्यवस्थितरित्या ती मूळ घरतात व नैसर्गिक वातावरण अनुकूल असल्याने रोपांची मर होत नाही. कढीपत्त्याचे झाड संपूर्ण वाळले तरी ते मरत नाही.
खत व्यवस्थापन :
कढीपत्त्याचे झाड हे बहुवर्षायू आहे, तसेच वारंवार याची पाने काढली जात असल्याने या पिकाला माती परीक्षणानुसार खतपुरवठा करावा लागतो.लागवडीनंतर १५ दिवसांनी जीवामृत देऊन कढीपत्त्यास पाणी दिल्यास रोपांची जोमाने वाढ होते. त्यानंतर प्रति झाड १० किलो शेणखत, ६० ग्रॅम नत्र, ८० ग्रॅम स्फुरद, ४० ग्रॅम पालाश प्रति वर्षी द्यावे. या पीकाला दरवर्षी प्रत्येक झाडाला १०-१५ किलो हिरवा पालापाचोळा आणि ५ किलो शेणखत द्यावे. भारी जमीनीत एकरी ५० किलो डीएपी दिल्याने पालवी चांगली फुटते.ही खते पावसाळ्याच्या सुरवातीस द्यावीत. कढीपत्त्याला महिन्यातून एकदा वाया गेलेले ताक १०० ते २५० मिली याप्रमाणे देणे फायदेशीर ठरते. आवश्यकतेनुसार निंबोळी पेंड, कंरजी पेंड सरीत मिसळून दिली तरीही चालते.
पाणी व्यवस्थापन :
झाडाला गरजेनुसार पाणीपुरवठा करावा. हिवाळ्यात भारी जमीन असल्यास महिन्यातून एकदा पाणी दिली तरी चालते मात्र जमीन हलकी असल्यास महिन्यातून २ वेळा पाणी द्यावे. उन्हाळ्यात भारी जमीन असल्यास २० दिवसांनी तर जमीन हलकी असल्यास १५ दिवसांनी पाणी द्यावे. पावसाळ्यात जमिनीतील ओल पाहूनच पाणी द्यावे.
तण व्यवस्थापन :
कढीपत्त्यावर फिक्कट हिरव्या बदामी आकाराच्या पानांच्या वेलवर्गीय तणाचा प्रादुर्भाव होतो. ह्या वेळचे आगारे कढीपत्त्याच्या कोवळ्या फुटीला वेढा मारतात. परिणामी कढीपत्त्याचे झाड हतबल होऊन वाढ खुंटते. तेव्हा झाडाभोवतीचे तण सतत काढावे.किडी-रोग व्यवस्थापन :
कढीपत्ता हे पीक कटक असल्याने सर्वसाधरणपाने किडी-रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. कढीपत्ता हा प्रत्यक्ष आहारात वापरला जात असल्याने रोग आणिकिडींच्या नियंत्रासाठी विषारी किटकनाशकांचा वापर न करता जैविक औषधांचा वापर करावा. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काच्या गरजेनुसार फवारण्या कराव्यात. तसेचकीड नियंत्रणासाठी शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत.
कढीपत्त्याचे उत्पन्न :
कढीपत्ता वर्षातून फक्त २ ते ३ फूट वाढतो. कढीपत्त्याच्या एका झाडाला ५ ते ६ फांद्या जोपासाव्यात. लागवड केल्यानंतर सुमारे १०-१५ महिन्यांनी कापणी करावी. योग्य पक्वतेला कढीपत्त्याची छाटणी केली करणे आवश्यक असते. मोठ्या प्रमाणात लागवड असेल तर जमिनीपासून १५ ते २० सें.मी. खोडाचा भाग ठेवून कढीपत्त्याची तोडणी करावी.
वर्षातून २ ते ३ वेळा काढणी करता येते. बी टोकून केलेल्या कढीपत्त्याचे उत्पन्न पहिल्या एकरी ५०० ते १००० किलो निघते. दुसऱ्यावर्षी ४ कापण्यांपासून पुढील साधारण ५ - ७ वर्ष ५००० ते ७००० किलोपर्यंत उत्पन्न निघते. पहिल्या वर्षी रोपांपासून कढीपत्ता मिळत नाही किंवा कमी मिळतो. मात्र नंतर दुसऱ्या वर्षापासून (१० ते १५ वर्षाचे झाडास ४ कापण्यातून) २५ किलोपर्यंतकढीपत्ता मिळतो.
आंतरपिके :
कढीपत्त्याची लागवड जर रोपे लावून केली असेल तर काढणी वेळ आणि उपलब्ध पाणी यांचा अभ्यास करून मेथी, कोथिंबीर, पालक, शेंपू, आंबडी, लाल बीट. इ. पिके सप्टेंबरपासून मधल्या मोकळ्या जागेत पिकवता येतात.
प्रक्रिया उद्योग :
कढीपत्त्याची पाने विविध पदार्थांमध्ये वापरली जातात. त्यामुळे जेव्हा भाव नसेल, कायमस्वरूपी त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळण्याचे दृष्टीने कढीपत्त्याची पावडर तयार करून ती बाजारात विकतात. पानांप्रमाणे पावडर नाशवंत न राहता अनेक दिवस राहू शकते.
(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता लेखक व प्रकाशक जबाबदार राहणार नाही.)
- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
(एम.एस.सी., पी.एच.डी. होर्टी. फळशास्त्र)
सहयोगी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
0 comments:
Post a Comment