बटाटा - काढणी व साठवणूक - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर व श्री. विरेंद्र चव्हाण, जळगाव



भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. आपल्या नेहमीच्या जेवणातील एक महत्वाचा घटक असणारे हे गहू, तांदूळ आणि मक्यानंतर जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाद्यान्न असून जगातील १३० देशात बटाट्याचे उत्पादन होते. बटाटा हे विकसित तथा विकसनशील देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, स्फुरद यासारखी खनिजे ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. वाढते शहरीकरण, वाढते उत्पन्न व त्यामुळे आलेली क्रयशक्ती या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत प्रक्रिया केलेल्या बटाट्याची मागणी सतत वाढत आहे. स्त्रियांच्या नोकरीवाढीमुळे व वाढत्या पर्यटनामुळे ही मागणी वाढतच राहणार आहे. अनेक उद्योजक व विदेशी कंपन्या या उद्योगात येत आहेत,



बटाटा पिकाचे उत्पादन खरीप हंगामापेक्षारब्बी हंगामामध्ये जास्त येत असल्याचे संशोधनांमधून सिद्ध झालेले आहे. जमिनीचे तापमान १७ ते २० अंश सेल्शिअस दरम्यान असल्यास; तसेच जमिनीमध्ये  योग्य ओलावा व पोषक अन्नघटक असल्यास बटाटे चांगले पोसतात. मध्यम प्रतीची, मिश्रित पोयट्याची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी जास्त चांगली असते. पाणथळ, भारी किंवा चिकण जमिनीमध्ये लागवड केल्यास बियाणे-बटाट्याच्या फोडी लागवडीनंतर लगेच सडत-कुजत असल्याने अश्या जमिनींची लागवडीसाठी निवड करू नये.
लागवडीसाठी फक्त प्रमाणित, सत्यप्रत व निरोगी-कीड व रोगमुक्त बियाणे वापरावे. काह्रीप हंगामातील लगेच ताब्बी हंगामातील लागवडीसाठी वापरू नये. बियाणे हे २५ ते ३० ग्राम वजनाचे, ५ सेंमी व्यासाचे, साधारणत: अंड्याच्या आकाराचे, पूर्ण वाढलेले व त्यवर अंकुर फुटलेले, ठेंगणे, जाड व त्यावर चांगले पोसलेले कोंब असावेत. एकरी ६-८ क्विंटल बियाणे पुसेशे असते. बियाण्याचे बटाटे कापून फोडी करण्यासाठी ० २. टक्के मॅन्कोझेबच्या द्रावणात बुडवून जंतूविरहित केलेले विळा-विळी किवा चाकू वापरावेत. लागवडीअगोदर कापलेल्या फोडी कमीत कमी १० ते १२ तास सावलीत सुकवून घ्याव्यात. कुफरी लवकर, कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी जवाहर (जे. एच. २२२), पुखराज, कुफरी बादशाह, कुफरी कुबेर, अलंकार, कुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत.
बटाटा लागवडीसाठी खरिपातील पिकांची काढणी होताच जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून एकरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. सरी-वरंबे तयार करून ४५ बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी. माती परीक्षणानुसार लागवडीपूर्वी एकरी ४० किलो नत्र, २५ किलो स्फुरद, ५० किलो पालाशची मात्रा द्यावी. उर्वरित २० किलो नत्राची मात्रा लागवडीनंतर एक महिन्याने देवून मातीची भर द्यावी. दुसऱ्यांदा मातीची भर ५५-६० दिवसात द्यावी. जमिनीचा मगदुर व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार  बटाट्यास थोडे-थोडे आणि कमी अंतराने पाणी देणे फायद्याचे ठरते. बटाट्यावर येणाऱ्या मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी आळी या रसशोषणाच्या किडींचा तर मर, करपा, तांबेरा या रोगांचा तज्ञांच्या सहाय्याने योग्य वेळी नियंत्रण करावे. सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळते, जमिनीचा पोत टिकून राहतो.  रब्बी हंगामामध्ये डिसेंबर व जानेवारीमधील वाढत्या थंडीमुळे बटाटे चांगले पोसून अधिक उत्पादन मिळत असल्याने १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान बटाटे लागवड करावी. त्यानंतर लागवड केल्यास पीकवाढीच्या काळात तापमान वाढल्याने उत्पादनावर विपरीत परिमाण होतो. उसात बटाटा आंतर पीक चांगला नफा देते.
साधारणपणे बटाटे ९० ते १०० दिवसांत काढणीस येतात. सर्वसाधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या ते दुसर्या आठवड्यात काढणी होते. काढणीआधी सुमारे २० दिवस पाणी देण्याचे बंद करावे. त्यामुळे बटाट्याची साल घट्ट तयार होते तसेच ओलसरपणा कमी होतो. काढणीपूर्वी बटाट्याची झाडे जमिनीलगत कापून घ्यावीत, -६ दिवसांनी बटाट्याची काढणी करावी. त्यामुळे बटाट्याची साल निघत नाही व वाहतुकीत बटाटा चांगला राहतो. सर्व सुधारित तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पिक घेतल्यास लवकर तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन एकरी ५० ते ८० क्विंटल व उशिरा तयार होणा-या जातीचे उत्पादन एकरी१०० ते १५० क्विंटलपर्यंत होऊ शकते.
बटाटे काढणीच्या पद्धती -
1)      पोटॅटो डिगरच्या सहय्याने बटाटे काढणे -
लागवड क्षेत्र खूपच जास्त असल्यास पोटॅटो डिगर या यंत्राच्या सहय्याने बटाटा पिकाची काढणी करतात. या पद्धतीने काढणी केल्यास कमी खर्चात, कमी वेळेत काढणी होतेच. शिवाय प्रतवारीनुसार विभागणही केली जाते. 
http://amzn.to/2sPNUfr

2)      लाकडी कुळव किंवा नांगर किंवा रिजरच्या सहय्याने बटाटे काढणे -
लागवड क्षेत्र जास्त असल्यास असल्यास सरीतून नांगर किंवा रिजर चालवून बटाटा पिकाची काढणी करतात. या काढणी पद्धतीमुळे जमिनीतील बटाटे अधिक खराब न होता जमिनीवर येतात. उर्वरित बटाटे बाहेर येण्याकरिता दुसऱ्यांदा पुन्हा त्याच सरीमध्ये नांगर किंवा रिजर चालवावा. जमिनीवर आलेले बटाटे मजुरांकडून वेचून घ्यावेत.
http://amzn.to/2sPNUfr

3)      कुदळीच्या सहय्याने बटाटे काढणे -
बटाटा लागवड कमी क्षेत्रावर असल्यास या पद्धतीने बटाटे काढणे शक्‍य होते. बटाटा काढणी पद्धतींपैकी ही सर्वांत सोपी पद्धत असली तरी या पद्धतीने बटाटे काही प्रमाणात चिरतात, त्यांची साल निघते. परिणामी बटाट्यांची प्रत खालावते.
काढलेल्या बटाट्यांना ऊन लागू नये म्हणून सावली तयार करावी. अन्यथा त्यातील साखरेचे प्रमाण वाढून बटाटे लवकर खराब होतात. उन्हाळ्यात बटाट्यांनाचांगला भाव मिळत असल्याने रब्बी पिकाचे बटाटे साठविणे फायद्याचे ठरते. पुढे खरीप पिकाच्या लागवडीसाठी बियाणे म्हणूनही हे बटाटे कमी पडतात. याउलट खरीप पिकांचे बटाटे साठवून ठेवण्याची गरज नसते.
बटाटे साठवणीच्या पद्धती -
शीतगृह -
बटाटे शीतगृहामध्ये साठवल्यास बटाट्यांची उगवणक्षमता चांगली टिकून राहते. बटाट्यांचा पुरवठा विभागून व जास्त काळपर्यंत करता येतो. शीतगृहामध्ये १.५- अंश सेल्शिअस तापमान आणि ८५ टक्के सापेक्ष आर्द्रता असल्यास ६ ते १२ महिनेपर्यंत बटाटे साठवून ठेवता येतात. १.५ अंश सेल्शिअस तापमानात बटाट्याचे कोंब १ वर्षाहूनही जास्त काळ आणि ५ अंश सेल्शिअस तापमानात ३० आठवडे सुप्तावस्थेत राहू शकतात. शीतगृहातून बाहेर काढल्यावर थोड्या अवधीमध्ये चांगल्या रीतीने फुटून येतात. या पध्दतीमध्ये टक्क्यापेक्षा जास्त बटाटे वाया जात नाहीत. बटाटे टणक राहतात व ते पोखरणारी अळी त्यातील तापमानात जिवंत राहत नाही. परंतु पाने वळणे या रोगाचा व्हायरस आणि गरवा करपा या रोगाचे कवक शीतगृहातील तापमानामध्ये क्रियाशील राहतात.
भारतात २००९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार १८५ लाख टन क्षमतेची शीतगृहे बटाट्यासाठी उभारण्यात आली होती, तसेच इतर शीतगृहांचाही बटाटा साठवणीसाठी उपयोग केला जात आहे. याद्वारे एकंदर २२० लाख टन म्हणजे देशातील उत्पादनाच्या ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बटाटा शीतगृहांत साठविला जात होता. महाराष्ट्रात खास बटाट्यासाठीची शीतगृहे नाहीत; पण येथे बहुउद्देशीय शीतगृहामध्ये बटाट्याची साठवण केली जात आहे.
अरण -
अरणीमध्येमोठ्या आकारमानाच्या बटाट्यांपेक्षा लहान आकारमानाचे बटाटे सर्वसाधारणपणे जास्त काळ टिकतात. पाने वळणे या रोगाचा व्हायरस आणि गरवा करपा या रोगाचे कवक शीतगृहातील तापमानात क्रियाशील राहत नसले तरी काळजी घेऊनही बटाटे नासण्याचे प्रमाण केव्हा केव्हा २५ टक्क्यापर्यंत असते. सावलीच्या जागी ३ ते ४ मीटर बाय ०.८० मीटर बाय ०.४५ मीटर मापाचा खड्डा खणून त्याच्या बाजू व तळ सपाट व गुळगुळीत करतात. निरोगी बटाटे वेचून ते खड्ड्यात आणि जमिनीच्या वर ४५-६० सें.मी.पर्यंत भरतात. ढिगावर वाळलेले गवत व लिंबाचा पाला ३० सें.मी.पर्यंत घालतात. अरणीमध्ये तापमान वाढू नये यासाठी ढिगाभोवती लहान पाट खणून त्यात वरचेवर पाणी सोडतात आणि आवश्यक वाटल्यास ढिगावर मधून मधून पाणी मारतात.
साठवणूक पद्धतीनिहाय २ ते १२ महिन्यांपर्यंत बटाटे साठवणे शक्य असते. बियाण्यासाठी साठविलेल्या कोंब येऊ नये यासाठी साठविण्यापूर्वी आयिसोप्रोपायिल-एन-(३-क्लोरोफिनायिल) या रसायनाची ५० मिली प्रति टन या प्रमाणात प्रक्रिया करतात. हे रसायन क्लोरोप्रोफॉम किंवा आयिसोप्रोपायिल-३-क्लोरोकार्बानिलेट या नावानेही ओळखले जाते.


- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर 
(एम.एस.सी., पी.एच.डी. होर्टी.)
सहयोगी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
श्री. विरेंद्र चव्हाण, जळगाव
(एम.एस.सी. एग्री.)
सहयोगी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment