झिरो बजेट नैसर्गिक शेती कशी करायची जाणून घ्या इथे…..


(प्रतिनिधी):- नागपूर नॅचरल आणि झिरो बजेट आध्यात्मिक नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीच्या वतीने ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार ३ मेपासून करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाळेकर यांनी बोलतांना सांगितले की, “रासायनिक शेती, सेंद्रीय शेती ही शेतकऱ्यांना कर्जात बुडवणारी आहे. त्याप्रमाणे शेतीसाठी वापरण्यात येणारे ठिबक सिंचन हे सुद्धा धोकादायकच आहे. ठिबक सिंचनात पाणी सरळ झाडांना जातो त्यामुळे झाडांचे नुकसान होते. यापेक्षा तुषार सिंचन हे लाभदायक आहे. जे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करतात त्यांनी तो तातडीने थांबवावा.” असे ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध तंत्रांबद्दल सांगितले. नैसर्गिक शेतीत आच्छादन आणि वाफसा हे महत्त्वाचे घटक आहे, यामुळे ९० टक्के पाण्याची बचत होते. पिकांना, झाडांना आच्छादन हे अत्यंत आवश्यक आहे. मुळांना पाण्याची आवश्यकता नसते. ५० टक्के वाफ आणि ५० टक्के हवा ही मुळांसाठी आवश्यक असते. पाणी जास्त दिले तर पिके पिवळी पडतात. दुपारी १२ वाजता झाडांची जी सावली पडते त्या सावलीच्या बाहेर ६ इंचावर पाणी दिल्यास वाफ तयार होते. ती वाफ मुळे शोषून घेतात. वाफ आणि हवेच्या मिश्रणामुळे झाडांची वाढ अत्यंत चांगली होते. कीड व्यवस्थापनाबद्दल सांगताना त्यांनी नीमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, शतपर्णी याबद्दल सांगतानाच विविध प्रकारचे बुरशीनाशक आणि टॉनिकची माहिती दिली. सप्त धानांकुर अर्क हा किडीसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगत ते कसे तयार करतात, याबाबत सांगितले. जमिनीची पोत कशी सुधारता येईल, देशी गाईचे महत्त्व काय, शेण आणि गोमुत्र याचे महत्त्व, त्यापासून तयार कोणारे जीवामृत, जीवामृताला वापरण्याच्या पद्धती आदींबाबत विस्तृत माहिती दिली.
रासायनिक आणि सेंद्रीय शेतीमध्ये १० टक्के पाण्याची बचत होते. पाणी पिकांसाठी खूप आवश्यक आहे. पिकांना भरपूर पाणी द्या, असे कृषी विद्यापीठ सांगत असतात. मात्र, त्यांचे हे शिक्षण धांदात खोटे आहे. झाडांना पाण्याची जास्त आवश्यकताच नाही. नैसर्गिक शेतीमध्ये ९० टक्के पाण्याची बचत होते, असा दावा श्री. सुभाष पाळेकर यांनी केला. या शिबिरामध्ये राज्यभरातून आलेले सुमारे एक हजार शेतकरी उपस्थित होते. सत्रादरम्यान श्री. सुभाष पाळेकर हे शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव विचारत होते. शेतकरीही त्यांनी त्यांच्या शेतात केलेले विविध प्रयोग मंचावर येऊन सांगत होते.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment