चांदवडच्या शेतकऱ्यांस टंचाईतही शेती फायदेशीर
फळे आणि पिकांवरील रासायनिक खते आणि कीड नाशकांचा अतिरेकी वापर नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असताना या रासायनिकीकरणास पर्याय म्हणून सदैव टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवडसारख्या तालुक्यातील वाहेगाव साळ येथील प्रयोगशील शेतकरी निवृत्ती न्याहरकर यांनी सेंद्रिय ‘दशपर्णी अर्क’चा पर्याय पुढे आणला आहे. कोणतीही रासायनिक खते व औषधांचा वापर न करता निव्वळ सेंद्रिय पद्धतीने त्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले असून उत्पादन खर्चात १० ते १२ हजार रुपयांची बचत त्यामुळे झाली आहे.
रासायनिक शेतीतून घेण्यात येणारी पिके आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्याने सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या फळांकडे तसेच पिकांकडे शेतकरी वळू लागले आहेत. न्याहरकर यांनी संपूर्ण कांदा पिकासाठी सेंद्रिय पद्धत व औषधांचा वापर केला आहे. त्यासाठी त्यांना एकरी केवळ ५५० रुपयांपर्यंत खर्च आला असून उत्पादन खर्चात घट झाल्याने सेंद्रिय शेती फायद्याची ठरत असल्याचे मत न्याहरकर यांनी व्यक्त केले आहे. न्याहरकर यांनी कांदा शेतीसाठी दशपर्णी अर्कचा वापर केला. त्यानुसार एक एकरसाठी आठ ट्रॉली शेणखत, दोन क्विंटल गांडूळ खत टाकून वाफे तयार केले. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात कांद्याची लागवड केली. त्यानंतर २०० लिटर पाण्यात गायीचे १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, दोन किलो गूळ, दोन किलो द्विदल धान्याचे पीठ, वड आणि पिंपळाच्या वृक्षाखालील अर्धा किलो माती मिश्रण असे सर्व काही देण्यात आले. सेंद्रिय पद्धतीच्या या खतामुळे कांद्याला पोषण मूल्ये मिळाल्याने त्याच्या आकारातही वाढ झाली. तसेच अडीच लिटर गांडूळ पाणी १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये १०० ग्रॅम गूळ टाकून तयार झालेले मिश्रण १०० लिटर पाण्यात टाकून फवारणी केली. यामुळे रोगांना अटकाव होऊन कांद्याच्या दर्जात वाढ झाली.
सीताफळ, कडुनिंब, पपई, निरगुडी, दोन किलो एरंडाचा पाला, दोन किलो देशी गायीचे शेण, पाच लिटर गोमूत्राचे मिश्रण २०० लिटर पाण्यात ३० दिवस सावलीत आंबविल्याने उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार झाल्याचे न्याहरकर यांनी नमूद केले. सुरुवातीला हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याबद्दल न्याहरकर यांना साशंकता होती; परंतु पाण्याची कमतरता असतानाही या अनोख्या पद्धतीमुळे कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले. सेंद्रिय शेतीच्या या प्रयोगाचा इतर शेतकऱ्यांनाही लाभ व्हावा म्हणून ते आता मार्गदर्शन करत आहेत. पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या ठिकाणीही अशा प्रकारे सेंद्रिय शेती केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, हे न्याहरकर यांनी सिद्ध केले आहे.
0 comments:
Post a Comment