शेडनेटचे रंग, सावली गुणांकाचे पिकावर होतात परिणाम

गत पाच वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मध्यवर्ती परिसरात जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागामार्फत विविध भाजीपालावर्गीय पिके व फुलपिके यांचे संरक्षित वातावरणात प्रयोग घेण्यात आले. त्यातून उपलब्ध झालेल्या शिफारशी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील.
डॉ. सुनील गोरंटीवार

सद्यपरिस्थितीत बाजारात विविध रंगांचे व सावली गुणांक असलेले शेडनेट उपलब्ध आहेत. यातील हिरवा, पांढरा, लाल या शेडनेट रंगांचा व ३५, ५० व ७५ टक्के सावली गुणांक असलेल्या शेडनेटचा पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास काटेकोर शेती प्रकल्पामध्ये करण्यात आला. या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.

काकडी :
अ) काकडी पिकाकरिता हिरव्या, पांढऱ्या रंगाच्या ३५, ५० व ७५ टक्के सावली गुणांक असणाऱ्या शेडनेटगृहामध्ये प्रयोग घेतले. त्यात नत्र, स्फुरद व पालाश यांची शिफारशीत मात्रेच्या विविध स्तरावर ठिबक व प्रचलित पद्धतीद्वारे खते देण्याच्या पद्धतींची तुलना करण्यात आली. त्यातून काकडीच्या अधिक उत्पादनासाठी ७५ टक्के सावली गुणांकाच्या शेडनेटगृहात लागवड करून, ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत मात्रेच्या (१००: ५०: ५० किलो / हेक्टर) १२५ टक्के विद्राव्य खते (२६ समान हप्त्यांत, चार दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर १५ दिवसांनी) देण्याची शिफारस करण्यात आली.
- शेडनेटगृहात पिकाच्या परागीकरणात मर्यादा येतात, हे लक्षात घेऊन गायनोसिअस जातीची लागवड आवश्यक आहे.
- तणांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता वीडमॅट सारख्या आच्छादनाचा वापर लाभदायी ठरतो.
- काकडीच्या उन्हाळी (जानेवारी) लागवडीसाठी ०.४ x १.३ मीटर अंतरावरील पिकाचे लाभखर्च गुणांक पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ब) वरील प्रयोगाचा निष्कर्ष लक्षात घेता, काकडी पिकाकरिता वरील प्रकारच्या शेडनेटमध्ये पिकाच्या पाण्याची आवश्यकता काढण्यात आली. त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत मात्रेच्या १२५ टक्के विद्राव्य खते (१२५ : ६२.५ : ६२.५) २६ समान हप्त्यांत चार दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर पिकाच्या (गायनोसिअस) जातीकरिता देण्यात आली. तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंदेरी-काळ्या रंगाच्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला होता.
दोन वर्षांच्या प्रयोगाअंती ५० टक्के सावली गुणांक असलेल्या लाल रंगाच्या शेडनेटगृहात लागवड करून चंदेरी-काळ्या रंगाच्या प्लास्टिक अाच्छादनाचा वापर केल्यास व ठिबक सिंचन पद्धतीने बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ६० टक्के पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळत असल्याचे आढळले. तसेच, उपलब्ध हिरवे पांढरे शेडनेटगृहात देखील बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ६० टक्के पाणी देण्याची शिफारस करण्यात आली.

कांदा : कांदा पिकाच्या शेडनेटगृहामधील लागवडीचे प्रयोग करण्यात आले. मात्र, हिरव्या- पांढऱ्या शेडनेटगृहामध्ये कांद्याची अनियमित वाढ होऊन, उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. शेडनेटगृहात कांदा लागवड करू नये, अशी शिफारस करण्यात आली.

झेंडू : झेंडू पिकाच्या (आॅगस्ट लागवड) ‘के वाय-६’ जातीकरिता विविध रंगांच्या व सावली गुणांकांच्या शेडनेटमध्ये केलेल्या अभ्यासात, ५० टक्के सावली गुणांक असलेल्या लाल शेडनेटगृहात ०.६५ x ०.३ मीटर अंतरावर लागवड व ठिबक सिंचनाद्वारे प्रतिदिन बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ०.१८५ (ETr) या मात्रेत सिंचन केल्यास झेंडू पिकापासून अधिक उत्पादन, नफा मिळतो व पाण्याचा कार्यक्षम वापर होत असल्याचे अाढळून आले.

ढोबळी मिरची :
अ) विविध सावली गुणांकाच्या शेडनेट (७५, ५०, ३५ टक्के), तसेच ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७५ टक्के, ५५ टक्के व ३५ टक्के) या उपचारांचा ढोबळी मिरची पिकावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. चंदेरी व काळ्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर व पाण्यात विरघळणारी खते दिवसाआड सर्व उपचारांमध्ये दिली. अशा सलग दोन वर्षांच्या अभ्यासातून खालील शिफारस केली.
चांगल्या प्रतीच्या ढोबळी मिरचीच्या (आॅक्टोबर लागवड) अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ७५ टक्के सावलीच्या शेडनेटगृहात लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे दररोज पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ७५ टक्के पाणी देण्याची शिफारस करण्यात आली.
ब) ढोबळी मिरची पिकासाठी नैसर्गिक वायुसंचरित हरितगृहामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७० टक्के व ४५ टक्के) व खतांच्या विविध मात्रा (शिफारशीत खत मात्रेच्या १२५ टक्के, १०० टक्के व ७५ टक्के) यांचे प्रयोग झाले. यात खते दिवसाआड देण्यात येत असून, चंदेरी व काळ्या प्लास्टिकचे आच्छादन केले होते.
शिफारस - हिरव्या ढोबळी मिरचीच्या आॅक्टोबर लागवडीमध्ये ठिबक सिंचनातून पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ७० टक्के पाणी प्रतिदिन आणि शिफारशीत खत मात्रेच्या १०० टक्के विद्राव्य खते (फळे येण्यापूर्वी ८ : २.८ : ४ : २.८ : ०.२ किलो प्रतिहेक्टर आणि फुले आल्यानंतर ६ : ३ : १५ : ३ : ०.३ किलो प्रतिहेक्टर नत्र- स्फुरद- पालाश- कॅल्शियम- मॅग्नेशियम) दिवसाआड ठिबक सिंचनाद्वारे देण्याची शिफारस करण्यात आली.

सध्या सुरू असलेले प्रयोग -
याचबरोबर सध्या खालील विविध पिकांवर संशोधन सुरू असून, लवकरच त्यावरील शिफारशी सादर करण्यात येतील.

खरबूज : प्रामुख्याने खरबूज पीक मोकळ्या जागेत घेण्यात येते. तथापि अधिक उत्पादन व उच्च प्रतीच्या खरबूज उत्पादनाकरिता या विभागाने चंदेरी-काळ्या प्लास्टिक अाच्छादनाचा वापर करून पिकाची विविध रंगाच्या शेडनेटगृहात (लाल, हिरव्या, पांढऱ्या) व विविध सावली गुणांक असलेल्या शेडनेटगृहामध्ये खत व पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी प्रयोग घेण्यात आला. प्रथम वर्ष प्रयोग पूर्ण झालेला असून योग्य शिफारशीकरिता पुढील चाचणी करण्यात येत आहे.

टोमॅटो :
अ) विविध सावली गुणांकाच्या शेडनेट (७५, ५०, ३५ टक्के), तसेच ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७५ टक्के, ५५ टक्के व ३५ टक्के) या उपचारांचा टोमॅटो पिकावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास चालू आहे. चंदेरी व काळ्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर व पाण्यात विरघळणारी खते दिवसाआड सर्व उपचारांमध्ये दिली जात आहेत.

ब) टोमॅटो पिकासाठी नैसर्गिक वायुसंचरित हरितगृहामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७० टक्के व ४५ टक्के) व खतांच्या विविध मात्रा (शिफारशीत खत मात्रेच्या १२५ टक्के, १०० टक्के व ७५ टक्के) यांचा प्रतिसाद पडताळणी चालू आहे. खते दिवसाआड देण्यात येतात व चंदेरी व काळ्या प्लास्टिकचा आच्छादनासाठी वापर सर्व उपचारांमध्ये केला जातो.

लाल कोबी :
अ) विविध सावली गुणांकाच्या शेडनेट (७५, ५०, ३५ टक्के), ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७५ टक्के, ५५ टक्के व ३५ टक्के), तसेच शिफारशीत खतमात्रेच्या विविध पातळ्या (१२५, १०० व ७५ टक्के) या उपचारांचा लाल कोबी पिकावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास चालू आहे. चंदेरी व काळ्या प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर सर्व उपचारांमध्ये करण्यात येत आहे.

ब) लाल कोबी पिकासाठी नैसर्गिक वायुसंचरित हरितगृहामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाण्याच्या विविध मात्रा (पीक बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९५ टक्के, ७० टक्के व ४५ टक्के) व खतांच्या विविध मात्रा (शिफारशीत खत मात्रेच्या १२५ टक्के, १०० टक्के व ७५ टक्के) यांचा प्रतिसाद पडताळणे चालू आहे. खते दिवसाआड देण्यात येतात व चंदेरी व काळ्या प्लास्टिकचा आच्छादनासाठी वापर सर्व प्रयोगांमध्ये केला जातो.

ब्रोकोली : विविध रंगांच्या शेडनेटगृहामध्ये ब्रोकोली पिकाचा (रब्बी व उन्हाळी हंगाम) प्रतिसाद तपासणे सुरू आहे. यामध्ये पांढरी, लाल, हिरवी, हिरवी + पांढरी व नेटविरहित वातावरणामध्ये प्रयोग घेण्यात येत आहेत. यामध्ये खते (शिफारस मात्रेच्या ६० टक्के, ८० टक्के व १०० टक्के) याबरोबर सिंचनाची बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ६०, ७०, ८०, ९० टक्के मात्रा दिली जात आहे.

डॉ. सुनिल गोरंटीवार, ९८८१५९५०८१
(काटेकोर शेती विकास केंद्र, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी)
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment