कृषी विभाग देणार काजू लागवडीला प्रोत्साहन

नागपूर - पारंपरिक पिकांना वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास आणि हमीभाव मिळत नसल्याची होणारी ओरड यावर पर्याय म्हणून आता नागपूर विभागात काजू लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, लवकरच या संदर्भाने मोर्चेबांधणी होणार असल्याची माहिती खुद्द विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी दिली.

पूर्व विदर्भातील गडचिरोली, नागपूर जिल्ह्याच्या रामटेकसह धान उत्पादक गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील वातावरण काजू लागवडीला पोषक आहे. यापूर्वीदेखील या भागात शेतकऱ्यांद्वारे काजूचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतले जात होते; त्याच्या खुणाही गडचिरोली, रामटेक परिसरात पाहावयास मिळतात. रोजगार हमी योजनेतूनदेखील कृषी विभागाने या भागात काजू लागवडीचा प्रयोग केला होता. शेतकऱ्यांकडून त्या वेळी होणारी काजूची लागवड लक्षात घेता त्यांना रोपांचा पुरवठा करण्याकरिता गडचिरोली, रामटेक येथील कृषी विभागाच्या नर्सरीतून सोय होती. या दोन्ही रोपवाटिकांमध्ये मातृवृक्ष आजही आहेत.

काजू लागवड यशस्वी होत असल्याचे अनुभव लक्षात घेता या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यानुसार वर्धा वगळता नागपूर विभागातील, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत काजू लागवड केली जाणार आहे. त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांनादेखील त्या पुढील काळात प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

मंगळवारी कार्यशाळा
बाय.एफ. संस्थेच्या माध्यमातून नाबार्डच्या वाडी प्रकल्पात सुमारे 700 एकरांवर काजू लागवड रामटेक तालुक्‍यात करण्यात आली आहे. कोरडवाहू असलेल्या या पीकापासून लागवडीनंतर तीन वर्षांत उत्पादन सुरू होते. या पिकाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मंगळवारी (ता. 28) वनामती येथे कार्यशाळा होणार आहे. कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी याला हजर राहतील. दापोली कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ला येथील काजू तज्ज्ञांना बोलावण्यात येणार आहे. विदर्भात हे पीक ठिबकवर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.

"पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काजू घेतला जातो. जंगली जनावरांचा या पिकाला त्रास नसल्यामुळे या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याकरिता कृषी विभाग प्रयत्नरत आहे. '
- विजय घावटे
विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर 
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment