*ऑरगॅनिक? की नॅचरल?*


https://play.google.com/store/apps/details?id=com.kalyani_softwares.kalyani_eeshwari.newspapers
गेल्या काही काळात विषमुक्त अन्न याबाबत वाढती जाणीव समाजात दिसू लागली आहे. त्याचे एक कारण, रासायनिक शेतमाल वर्षानुवर्षे ग्रहण केल्याने सर्वदूर घरोघरी पसरलेली रोगग्रस्त प्रजा, आणि त्याचे दुसरे कारण म्हणजे व्यापाऱ्यांनी ऑरगॅनिक असे लेबल लावून, त्याची वारंवार जाहिरात करून निर्माण केलेला भयग्रस्त अर्धज्ञानी ग्राहक.
याला एक तिसरेही कारण आहे. ते म्हणजे *पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी उभी केलेली आणि असंख्य दृश्य-अदृश्य कार्यकर्त्यांनी चालवलेली शून्य खर्चाची अध्यात्मिक नैसर्गिक शेती चळवळ* या चळवळीतून अनेक लहानमोठ्या शेतकरी-ते-ग्राहक विक्री व्यवस्था उदयाला आल्या आहेत आणि जागोजागी काही शे-हजार ग्राहक नैसर्गिक शेतकऱ्यांकडून थेट अन्न पदार्थ मिळवू लागलेत. त्यांच्या संख्येचा वाढता आलेख आहे. अशा नव-समूहातून काही विषय लोक वारंवार चर्चेला घेत असतात. त्यात kyc सारखे kyf, म्हणजेच *know your farmer* किंवा, अमुक ऋतूत अमुक एक भाजी खाणे योग्य असण्या किंवा नसण्यासंबंधी विषय असतात. त्यांतच एक विषय जवळजवळ सतत चर्चेत असतो. तो म्हणजे *ऑरगॅनिक (किंवा सेंद्रिय) आणि नॅचरल (किंवा नैसर्गिक) शेतीतला फरक.*
या दोहोंतला फरक सामान्य माणसाला सहज लक्षात येत नाही पण थोड्या समजावण्याने कळू शकतो. तसा भेद तुम्हालाही करता यावा यासाठी हा खटाटोप:
एखादा जीव (organism) जसा स्वयं-उर्जेतून जन्माला येतो, वाढत जातो, आजूबाजूच्या परिसंस्थांच्या असण्यातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करतो, त्याची वाढ स्वयंस्फूर्त, जैविक म्हणजेच ऑरगॅनिक असते. त्याच्या असण्यासाठी त्याच्या सभोवतालच्या जीवसृष्टीने एक सहजीवन व्यवस्था मान्य केलेली असते. या व्यवस्थेत भागीदारी असलेले सर्व जीव निसर्गाच्या पूर्वलिखित नियमानुसार आपापले काम बजावत असतात, आपापले जीवन जगत असतात आणि घटिका भरल्यावर नियमानुसार येणाऱ्या पुढील जीवास वाट मोकळी करून देतात. या नैसर्गिक परिक्रमणेला धक्का न लागू देता जे साधता येईल, ते इष्ट. त्यालाच जैविक किंवा सेंद्रिय, किंवा आंग्लाळलेल्या सहजभाषेत ऑरगॅनिक, म्हणतात. अशा सहिष्णू पद्धतीने केलेल्या कुठल्याही कामातून कुठल्याही जीवास हानी होणार नाही, निसर्गाच्या नियमांच्या विपरीत काही जाणार नाही असे अपेक्षित आहे.
मागील काही काळात रासायनिक शेतीमुळे होणारे दूरगामी दुष्परिणाम लपवणे अशक्य झाल्यावर त्यापासून दूर जाण्याचे मार्ग म्हणून काही सेंद्रिय शेती पद्धती विकसित झाल्या खऱ्या, पण *हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून शेतीला रासायनिक दरीत लोटणाऱ्या बाजारू व्यवस्थांनीच इथून पुढे सेंद्रिय शेतीला त्यांचे दुकान बनवून टाकले.* सामान्य माणूस दिशाहीन व स्वार्थी असतो, त्याला स्वतः सोबतच परिसंस्थेचे हित जपणे स्वाभाविकपणे उमगत नाही. आपले अन्न विषमुक्त झाले म्हणजे पुरे झाले इथवर त्याला कळत असते. पण *माणसासाठी सुरक्षित अन्न पिकवताना त्यासोबत हवा, पाणी व जमीन प्रदूषित होणार नाही हे साधणे आवश्यक असते.* *आम्ही सेंद्रिय शेती करतो, असं म्हणणारे शेतकरी विचाराने सात्विक असले तरी किंचित वाट चुकलेले तरी असतात किंवा पाळेकर पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांकडून अवमानित झालेले असतात.* थोडा, पण महत्वाचा असा शेती पद्धतीत बदल करून पूर्णतः नैसर्गिक शेतीकडे खरंतर ते वळू शकतात. त्यातून ऑरगॅनिक किंवा सेंद्रिय शेती मुळातच महागडी पद्धत आहे. त्यातील औषधे, बायोएंझाईम, तण/कीड नाशके यातले काहीच स्वस्त नाही (असे का, ते थोडा विचार केल्यास कळणे कठीण नाही). त्यातून पुढे, रासायनिक असो वा सेंद्रिय, शेतकरी पिकवण्याच्या कामात इतका व्यग्र असतो की स्वतःच्या शेतात पिकवलेल्या मालाची विक्रीदेखील त्याला साधत नाही, त्यासाठी तो परावलंबी असतो. *शेतकरी ज्या व्यवस्थेवर विसंबून असतो, त्याच व्यवस्थेने त्याला जेरीस आणून सोडले आहे*. त्या बाजार व्यवस्थेने ऑरगॅनिक हे विशेषण वापरले की त्याच वस्तू चढ्या किमतीला विकता येतात हे हेरले आहे. ते एकीकडे ग्राहकांची नस ओळखून ऑरगॅनिक असे लेबल लावून ज्यादा दरपट्टीने (प्रीमियम प्रायसिंग) माल विकत असतात, तर दुसरीकडे शेतकरी मात्र सेंद्रिय खते, कीडनाशके खरेदी करण्यात कर्जबाजारी होत असतो.
यात सेंद्रिय शेतकऱ्याचा दोष नाही. तो विषारी अन्न पिकवणे हेतुपुरस्सर टाळतच असतो, आणि बरेचदा त्याला प्रीमियम प्रायसिंग बाबत काही गती नसते. अडचण असते ती विक्रीव्यवस्थेतील परावलंबनाची. _मध्यस्थांनी अवास्तव फुगवून वाढवलेली किंमत, यामुळे मधल्यामध्ये ऑरगॅनिक हे बिरुद धोकादायक झालं आहे._
याउलट *नैसर्गिक शेतकरी शून्य खर्चाची (आणि बऱ्याच मेहनतीची) शेती करत असताना कर्ज डोक्यावर नसल्याने तो त्याचा वेळ परस्पर ग्राहक मिळवण्यात खर्ची घालू शकतो. शिवाय पिकणारे अन्न तर विषमुक्त असतेच पण पाळेकरांची शिबिरं-फेऱ्या करून आलेले ग्राहक स्वतः zbnf चा माल मागू लागतात, त्याचा त्याला लाभ होतो*.
नैसर्गिक म्हणजे रूढार्थाने सेंद्रिय. पण *आजकालचे बाजारू सेंद्रिय म्हणजे पूर्णार्थाने नैसर्गिक नाही* आणि सर्वोपकारी तर मुळीच नाही. वर्मीकंपोस्ट या विषयावर खोलात जाऊन विचार केला, तर ते कारखान्यात बनवण्याच्या प्रक्रियेतून टाळता येण्याजोगा हरितगृह वायू उत्सर्जित होत असतो. कारखान्यातून शेतात असे वर्मीकंपोस्ट आणताना वाहतुकीत आणखी अनावश्यक पर्यावरण हानी होत असते. तीच गोष्ट शेणखताची. पारंपरिक शेतीत वापरात असलेले शेणखत वापरायचे झाल्यास दोन अडचणी येतात - एक तर इतक्या मोठ्या प्रमाणात शेण दुष्प्राप्य असते, दुसरे म्हणजे कुठलीही गोष्ट मिळणे कठीण झाले तर ती लगेच महाग होऊ लागते, आणि दलालांचे फावते.
*ऑरगॅनिक म्हटले की विषमुक्त आहे असे ग्राहकास कळेल असे गृहित धरून, किंवा ग्राहक - बहुतेक भोळेपणाने - "मला ऑरगॅनिक हवे आहे" असं म्हणत असेल, तर नैसर्गिक शेतकरी आपल्या मालाबद्दल "हो, ऑरगॅनिक आहे", असे सांगताना दिसतो. पण कुणी जाणत्याने विचारले तर लगेच तो नैसर्गिक शेतीच्या कहाण्या आणि पाळेकरांच्या शिबिरातील, शेतातील अनुभवांचे वर्णन करतो. एकदल-द्विदल वाणांचे आंतरपीक, त्यायोगे नैसर्गिकरित्या संभाळलेला नत्रसंयम, आच्छादन, वाफसा, ह्युमस, अत्यल्प पाणी-विजेत नियोजन, असे नैसर्गिक शेतीतले काही कळीचे मुद्दे आहेत. *ग्राहकाचे याविषयीचे अज्ञान हा नैसर्गिक शेतकऱ्याचा नाईलाज आहे.*
*पण याउलट कधीही कुणी नैसर्गिक शेतीचे वाभाडे काढत ऑरगॅनिक शेतमालाची पुंगी जोरात वाजवताना दिसला, तर समजावे याला तुमच्या स्वास्थ्यापेक्षा प्रीमियम प्रायसिंग मध्ये अधिक रुची आहे. सेंद्रिय शेतीत औषधे, संजीवके आदी पदार्थांचा वापर म्हणजे निसर्गाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असून पर्यायाने एकूणच पर्यावरणास हिताचा ठरत नाही हे मान्य करावेच लागते. *ग्राहकाचे यातले अज्ञान हा "ऑरगॅनिक" मालाच्या व्यापाऱ्यांचा अनौरस नफ्याचा महामार्ग आहे.*
_अशा रीतीने,आणि दुर्दैवाने, ऑरगॅनिक आणि नॅचरल या परस्परविरोधी संकल्पना होऊन बसल्या आहेत._
ऑरगॅनिक माल विकणारे दुकानदार बरेचदा zbnf शेतकऱ्यांकडून कमी किमतीत घेतलेला मालसुद्धा ऑरगॅनिक च्या नावाखाली दामदुपटीने विकतात. थोडक्यात, यातून एक समांतर दलाल व्यवस्था उभी राहू पाहते आहे ज्यामुळे विषमुक्त अन्न हे केवळ श्रीमंतांच्या आवाक्यात असेल. हे टाळण्यासाठी ग्राहकाने सुयोग्य किमतीच्या zbnf मालाचा आग्रह धरणे आवश्यक आहे, तसेच zbnf शेतकऱ्याने जमेल तसे, शक्य असेल तेंव्हा, आपला माल विषमुक्त असण्याबाबतच्या चाचण्या करून तसे प्रमाणपत्र मिळवत राहणे गरजेचे आहे.
आता तुम्हाला ऑरगॅनिक आणि नॅचरल, किंवा सेंद्रिय आणि नैसर्गिक, यातला नेमका भेद कळला तर हा लेखणीप्रपंच कारणी लागला असे म्हणता येईल.
- आशुतोष प्रधान
९८२३०३४२६४
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment