शेतकरी – अन्नदाता कि विषदाता ?

हा लेख कदाचित कडू वाटेल, पण – एका सामान्य माणसाच्या मते - हे सत्य आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही त्यामुळे माझ्यावर कोणी नाराज होऊ नये.. हि विनंती.
आपल्या देशात अनेक मान्यवर शेतकरी बंधू उत्तम प्रकारे आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करून देशाच्या आणि पर्यायाने समाजाच्या उत्कर्षाला हातभार लावत आहेत. अनेक जणांना पूर्वीच्या चुकांची जाणीव होऊन ते नैसर्गिक शेतीच्या मागे येत आहेत..... त्यांच्या साठी खालील लेख अजिबात नाही.
आपल्या मनात आज “शेतकरी” म्हटल्यावर आज जी प्रतिमा निर्माण होते अश्या प्रकारच्या शेतकऱ्यांबद्दल हा लेख आहे.
----------------------
काही उदाहरणे पाहू.
मी लहानपणी सायकल भाड्याने घेऊन शिकलो. तेव्हा सायकल भाड्याने देणे हा एक व्यवसाय होता. हळू हळू लोकांनी सायकल स्वतः विकत घेणे चालू केले आणि सायकल भाड्याने देणे हा व्यवसाय कमी होत गेला. काही सायकल वाल्यांनी त्याच्या व्यवसायात बदल केला आणि सायकल विक्रीचा व्यवसाय सुरुकेला , काही जणांनी सायकलला सुशोभित करण्यासाठी लागणारे साहित्य विकायला सुरुवात केली. पण काही जणांनी मात्र पूर्वीचाच व्यवसाय चालू ठेवला आणि कमी होत जाणाऱ्या व्यवसायाकडे दुखी मनाने पाहत राहिले.
टायपिंग चा व्यवसाय , STD-PCO चा व्यवसाय यासारखे अनेक व्यवसाय काळाच्या ओघात बदलत गेले. काही लोकांनी काळानुसार स्वतःला बदलले तर काही जन कालाय तस्मै नमः म्हणत रडत बसले. हीच गोष्ट मोठ्या व्यवसायात देखील आढळते. एकेकाळी जगावर राज्य करणारा नोकिया हा मोबाईलचा ब्रांड, technology मध्ये झालेल्या बदलाला वेळीच सामोरे न गेल्याने आपटला. Videocon , LG यासारखे भारतात क्र.१ आणि २ वर असणारे TV चे ब्रांड देखील LED / LCD technology आल्यावर खालावले. त्यांची जागा अन्य कंपन्यांनी बळकावली.
अशी अनेक क्षेत्रातली अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. सर्वांचा सारांश एकच. व्यवसाय करतांना आपल्याला काळाप्रमाणे बदलावे लागते ,नाहीतर आपणच आपल्या पतनाला जबाबदार असतो. दुसरे कोणी नाही. आपण व्यवसायात चुका केल्या तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात.
शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्याला व्यवसायाचीच तत्वे लागू होतात. हि तत्वे निसर्ग नियम आहेत आणि कोणीच त्याला बदलू शकत नाही. सरकार फक्त त्यासाठी साह्यभूत होऊ शकते इतकेच.
सध्या शेतकऱ्यांना बिचारे म्हणण्याची एक मोठी स्पर्धाच देशात लागली आहे. शेतकरी म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येते ?
प्रचंड सुकलेली जमीन , त्यावर उघड्या अंगाने आकाशाकडे पहात बसलेला शेतकरी. आणि मग शेतकर्याला बिचारे ठरवण्याची भुमिकाच देशात लागून गेली आहे.शेतकऱ्यांना प्रगती करण्यासाठी काय तर कर्ज माफ करा, वीज बिल माफ करा .. समजा केले तर पुढे काय ? त्याचा व्यवसाय सुरळीत होईल का ? पुन्हा कर्ज आणि पुन्हा कर्जमाफीच्या मागण्या , मोर्चे , धिक्कार , शिव्या वगैरे, वगैरे ..
एक सामान्य माणूस म्हणून शेतकरी एक भिकारीच वाटायला लागला आहे. किंबहुना हि प्रतिमा उभी करण्यात राजकीय पक्ष, मिडिया आणि स्वतः शेतकरी जबाबदार आहेत. शेतकऱ्याला मी किती जास्त केविलवाणा दाखवतो अशी स्पर्धा चालू आहे. आणि शेतकरी देखील, कर्ज माफ होईल, वीजबिल माफ होईल असे कोणी म्हणले कि त्याच्यामागे झेंडा घेऊन जायला तयार !
खालील मोठ्या चुका शेतकऱ्यांकडून, राजकीय पक्षाकडून आणि कृषी शास्त्रज्ञांकडून होत आहेत.
१ – हजारो वर्षापासून आपल्या देशात शेतीचा व्यवसाय होत आहे आणि तरी सुद्धा आपली जमीन स्वातंत्र मिळेपर्यंत उपजाऊ राहिली आणि गेल्या ७० वर्षात असे झाले कि हजारो वर्ष तग धरलेली आपली जमीन ७० वर्षातच सुमारे ६० टक्के पर्यंत नापीक झाली ? या गोष्टीला प्रथम सरकार आणि त्या काळातले कृषी शास्त्रज्ञ जबाबदार आहेत. स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्या देशात गायीच्या / बैलाच्या शेणाचा वापर खत म्हणून होत होता.ज्यासाठी काही खर्च नव्हता. जमिनीचा कस टिकून रहात होता. बियाणासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नव्हती.जगभरात सर्वोत्कृष शेतकी पैदावार असलेल्या आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर रासायनिक खते आणि फवारणी कोणी आणि का आणली ?
रासायनिक खतांचा दुष्परिणाम जमिनीवर आणि पिकांवर काय होईल याचा अंदाज घेण्याइतकी हुशारी देशात नव्हती का ?
कि बाहेरून आलेले ज्ञान ते चांगले आणि आपले ते मागासलेले हि वृत्ती तेंव्हाच्या शास्त्रज्ञांमध्ये देखील होती.
कि कळत असून देखील हे शास्त्रज्ञ धृतराष्ट्राची भूमिका घेत होते ?
तेंव्हा मी या लेखाद्वारे हजारो वर्षांची आपली भू संपदा ७० वर्षात नासवणार्या आणि तत्कालीन सरकारच्या धोरणांना आंधळेपणाने पाठींबा देणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांचा तीव्र धिक्कार करतो.शेतकऱ्यांना तर काय बोलावे ? रासायनिक खतांच्या वापरानंतर ३-४ वर्षात कमी होत जाणारे पिक , वाढलेली कीड , खतांवर वाढत चाललेला खर्च या सर्व गोष्टींची दखल घेणे असे करायला शेतकरी डोकेबाज थोडी आहे ? तो तर आपला बिचारा , गरीब , दिन दुबळा वगैरे वगैरे ... वर सायकल च्या व्यवसायाचे उदाहरण आठवते ? व्यवसायात डोके नाही वापरले , बुद्धी गहाण ठेवली तर व्यवसाय बुडणार हे नक्की.
२ – स्वातंत्र्यानंतर काही वर्षातच , दुग्ध क्रांती या गोंडस नावाखाली आपण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली देशी गाय नासवली. कुठलेही डोके न वापरता , बाहेरच्या संशोधनाला श्रेष्ठ मानून , स्वतःला मागासवर्गीय समजणाऱ्या सरकारने आणि तत्कालीन शास्त्रज्ञानी परदेशातून मोठ्या प्रमाणात डुक्करसदृश्य जर्सी, होल्स्तेन या प्राण्यांचे वीर्य आयात करून देशी गायींशी संकर करून नवीन प्राण्याची निर्मिती केली. आपण आज जे दुध गायीचे समजून पीत आहोत , ते सर्व जर्सी प्राण्याचे दुध आहे.जेंव्हा न्यूझीलंड मधील कीथ वूडफोर्ड या शास्त्रज्ञाने संशोधन करून सिद्ध केले कि या दुधाचे पचन होत असतांना बिटा केसो मोर्फिन नावाचा अमली गटातील पदार्थ तयार होतो. म्हणजेच आपण जर्सी गायीचे ( प्राण्याचे) एक कप दुध पितो तेंव्हा काही microgram मध्ये अमली पदार्थाचे सेवन करतो. यावर जगात ९७ वेळा संशोधन झाले आणि हाच निष्कर्ष निघाला. अनेकदेशात या दुधावर बंदी आहे, अनेक देशात या दुधाचा प्रकार ( A-1 किंवा A-2 ) पिशवीवर लिहिण्याचे बंधन आहे. पण आपण अजून झोपलेलो आहोत. या गोष्टीला देखील हि कल्पना अमलात आणणारे सरकार आणि तत्कालीन शास्त्रज्ञ जबाबदार आहेत.शेतकऱ्याकडून तर डोके वापरण्याची अपेक्षाच चुकीची आहे.
३ – वरील दोन कारणांमुळे आपल्या देशातील सुमारे ७० टक्के जनता आज आजारी आहे. आपल्या १० नातेवायीकांची यादी करा आणि पहा. थोड्याफार फरकाने , आपल्याला हेच आढळेल. जर्सी प्राण्याचे दुध आणि विषयुक्त अन्न आज देश खातो आहे. माफ करा पण याला शेतकरी कळत नकळत जबाबदार आहे. डोके न वापरता जमेल तेवढे रासायनिक खत ओतायचे, पिकांवर, फळांवर लवकर पिकण्यासाठी दणकून विषाची फवारणी करायची आणि पैश्याच्या मागे लागायचे ! स्वतःच्या कुटुंबियांना दुध देण्यासाठी एखादी देशी गाय पाळायची आणि बाकी सर्व जर्सी प्राण्याचे दुध विक्रीसाठी काढायचे ! लक्षात ठेवा लहान मुलांना देखील आज आम्हाला हे विषयुक्त अन्न खाऊ घालावे लागतेय. आम्हा लोकांसाठी तर काय , आभाळच फाटले आहे, सर्वत्र विषारी अन्न , काय करणार ? याला शेतकरीच जबाबदार आहे. गायीचे दुध आम्ही विश्वासाने , गायीचे दुध म्हणून म्हणून पितो , पण ते अमली द्रव्य असते , याला शेतकरीच जबाबदार आहे. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसतात पण लाखो लोकांचा विषयुक्त अन्नामुळे अकाली झालेला मृत्यू कोण पाहणार ? कदाचित शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला हा अव्यक्त तळतळाट च कारणीभूत असेल कदाचित ! या शेतकऱ्यांना अन्न दाता म्हणावे कि विष दाता हेच समजत नाही.
४ – प्रत्येक सरकार च्या काळात काहीना काही योजना शेतकऱ्यांसाठी आखल्या जातात. राजकीय पक्षांना जर खरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. उदा. यासरकारने कर्ज माफी केली. लाखो शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली पण अनेक शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे कि त्यांना ONLINE ENTRY करणे जमत नाही. काही गावात एक प्रयोग झाला.प्रत्येकी ५० रुपये देऊन ONLINE ENTRY करून देण्याचा व्यवसाय काही जणांनी वैयक्तिक पातळीवर सुरु केला. हि एक अत्यंत चांगली कल्पना आहे. ५० रुपये देणे शेतकऱ्यांसाठी जड नाही , आणि ते देखील कर्ज माफ होत असेल तर ! आणि नुसते सरकारचा धिक्कार करत मोर्चे काढण्यापेक्षा त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात मदत केली तर ती खरी मदत होईल. नाही तर प्रत्येक वेळी शेतकरी नेहमी विरोधी भूमिकेतच उभा केला जातो. अर्थात , समाजातील अनेक मंडळीनी (उदा.नाना पाटेकर. हे प्रसिद्ध नाव आहे म्हणून, पण त्यांच्यासारखी अनेक मंडळी) ज्याप्रमाणे स्वतः जमिनीवर उतरून प्रत्यक्ष मदतीस सुरुवात केली. त्यांच्या पेक्षा आंदोलन करण्यार्या आणि त्यास प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय पुढार्यांकडे कितीतरी जास्त संपत्ती आहे. पण ही नेते मंडळी शेतकऱ्यांना भडकावण्यातच धन्यता मानतात. असो. आणि शेतकरी म्हणजे शेतकरी च ! डोके वापरता येत नाही म्हणून तर त्याच्या व्यवसायाची हि अवस्था झाली आहे. त्यामुळे अशी मंडळी तर कुणी कर्ज माफीच्या आंदोलनाचा तुकडा समोर केला कि चालले लाळ घोटत , झेंडे घेऊन , मुर्दाबाद च्या घोषणा द्यायला ! या शेतकऱ्यांकडून तरी , ते बदलतील अशी काही अपेक्षा नाही.नवीन पिढीने तरी आपल्या बापाप्रमाणे वागू नये आणि डोके वापरून व्यवसाय करावा.
याला काय उपाय आहे ?
याला एकमेव उपाय म्हणजे सरकारच्या ज्या काही योजना आहेत, त्या आपल्याच गावातील समजूतदार माणसाकडून समजून घ्या आणि त्याचा लाभ घ्या.
नैसर्गिक शेती कडे वळा. व्यवसायाकडे निट पणे लक्ष द्या. उगाच आंदोलने , मोर्चे यामध्ये आपल्या व्यवसायाचा वेळ वाया घालवू नका...
अन्यथा येत्या काही वर्षातच आपली जमीन नापीक होईल,शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे “रोजचेच मढे त्याला कोण रडे “असे होऊन जाईल. अन्नाचा तुटवडा सुरु झाला तर हि उद्योजक मंडळी धावून येतील एक एक हजार एकर जमीन विकत घेतील , सेंद्रिय पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करून देशाची गरज उत्तम रीतीने भागवतील.
तेंव्हा अन्नदात्यांनो , कृपया व्यवसाय नीट करा आणि आनंदाने जगा. आम्हाला आणि धरणी मातेला अन्न खाऊ घाला विष नाही. तेंव्हा आमचे देखील मनापासून आशीर्वाद आपणास लाभतील.
धन्यवाद !
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment