जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे का व्हावे? याचा विचार आपण सातत्याने करीत होतो. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मानवाने शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले. माती आणि इतर सर्व संसाधनांकडून अधिक ओरबाडून घेण्याचे प्रमाण वाढले. गरजा अधिक म्हणून अधिक उत्पन्नाची गरज, पण यातून जे साध्य करायचे ते झालेच नाही. निसर्गाचे मात्र शोषण झाले, असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे. मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे ‘झिरो बजेट’, अशी सुभाष पाळेकर यांची सहज-सोपी संकल्पना आहे.
आधुनिक पद्धतीने रासायनिक शेतीतून उत्पन्न वाढवायचे की, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारायचा, अशा संभ्रमावस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकवण्यासाठी धडपडत आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून उन्नती साधलेली असताना महाराष्ट्रात मात्र त्यांचे कार्य दुर्लक्षित आहे. सुभाष पाळेकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले, तेव्हा ते आंध्र प्रदेशातील एका शिबिरात ६ हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. ‘झिरो बजेट’ या त्यांच्या संकल्पनेतच नैसर्गिक शेतीचा मंत्र दडला आहे. या शेतीत काहीच विकत घ्यावे लागत नाही. एका गायीपासून मिळणाऱ्या शेण आणि मूत्रापासून ३० एकर शेती कसता येते, असा सुभाष पाळेकर यांचा दावा आहे. तब्बल ८ वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी या तंत्राची सिद्धता पटवून दिली आहे.
जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे का व्हावे? याचा विचार आपण सातत्याने करीत होतो. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मानवाने शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले. माती आणि इतर सर्व संसाधनांकडून अधिक ओरबाडून घेण्याचे प्रमाण वाढले. गरजा अधिक म्हणून अधिक उत्पन्नाची गरज, पण यातून जे साध्य करायचे ते झालेच नाही. निसर्गाचे मात्र शोषण झाले, असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे. मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे ‘झिरो बजेट’, अशी सुभाष पाळेकर यांची सहज-सोपी संकल्पना आहे. या तंत्रात शेतकऱ्याला काहीही विकत घेऊन टाकावे लागत नाही.
ट्रॅक्टरने शेणखत विकत घेऊन टाकण्याचीही गरज नाही. रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते किंवा गांडूळ खत, विषारी कीटकनाशके, संकरित बियाणे वापरण्याची गरज नाही. या पद्धतीत ओलिताच्या शेतीत जेवढे पाणी लागते, त्याच्या केवळ १० टक्के पाणी आणि १० टक्के वीज लागते. उत्पादन कमी नाही. मात्र जे उत्पादन मिळेल जे विषमुक्त, पौष्टिक आणि उत्कृष्ट चवीचे मिळते. या नैसर्गिक शेतमालाला बाजारात प्रचंड मागणी आहे आणि दीडपट ते दुप्पट भाव मिळतात. जमीन सुपीक व समृद्ध बनते. नैसर्गिक शेती ‘ग्लोबल वॉर्मिग’ रोखण्यास मदत करते. हवेतील अधिकाधिक कार्बन हे काष्ट आच्छादनात बंदिस्त करण्याची आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून हवेतील जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड बंदिस्त करण्याची किमया फक्त ‘झिरो बजेट’ शेती करते, असे सुभाष पाळेकर सांगतात.
जंगलातील झाडे मानवी हस्तक्षेपाशिवायही वाढतात. निसर्गच त्यांना अन्नद्रव्ये पुरवतो. सगळी शेती ही निसर्गानेच वाढवलेली आहे. यात मानवाची भूमिका ही केवळ सहायकाची आहे. मानव हा निर्माता नाही. गव्हाचा दाणा, ज्वारीचा दाणा कारखान्यात तयार होऊ शकत नाही. ते आपले सामथ्र्य नाही. तो केवळ निसर्गाचा एकाधिकार आहे. पीक किंवा फळझाडे ही सर्व अन्नद्रव्ये जमिनीतूनच घेतात. वास्तविक, कोणत्याही झाडा-झुडुपाचे शरीर ९८.५ टक्के हवा, पाणी आणि सूर्यशक्तीपासून निर्माण होत असते. पाळेकर यांच्या मते निसर्गानेच हे सर्व काही शिकवले आहे. आपण फक्त या अध्यात्त्माशी निगडित नैसर्गिक शेती तंत्राला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहोत. बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा ही झिरो बजेट नैसर्गिक शेतीची चतु:सूत्री. यात देशी गायीचे शेण आणि गोमूत्राला फार महत्त्व आहे. शेतीत शेणाचा वापर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात करायचा, यावर सुभाष पाळेकर यांनी आठ वष्रे संशोधन केले. शाश्वत पीक संरचनेसाठी त्यांनी काही सूत्रे मांडली.
आपण जेव्हा एक ग्रॅम शेण शेतात टाकतो, तेव्हा तब्बल ३०० कोटी जिवाणू जमिनीत टाकतो. एक देशी गाय दिवसाला सरासरी ११ किलो शेण देते. एका गायीचे एका दिवसाचे शेण एका एकराला महिन्यातून एकदा द्यायचे आहे. म्हणजे ३० दिवसांचे शेण ३० एकराला पुरेसे आहे, तेही विरजण म्हणून, अन्न म्हणून नव्हे. पीक कोणतेही असो.
कोरडवाहू असो किंवा ओलिताचे. हंगामी पिके असो किंवा बारमाही फळबागा. एका एकराला १० किलो शेण वापरायचे. हे वापरल्याने आपण एक एकर जमिनीत ३० लाख कोटी सूक्ष्म जिवाणू सोडून जमीन सजीव करू, पण संपूर्ण जमीन सजीव झाल्याशिवाय झिरो बजेट नैसर्गिक शेतीत निसर्गाच्या सर्व यंत्रणा संपूर्ण कार्यक्षमतेने कामी लावता येणार नाही. त्यासाठी जिवाणूंची संख्या अनेक पटींनी वाढवावी लागणार, हे आपल्या लक्षात आले. हे करण्यासाठी आपण किण्वन क्रिया (फर्मेटेशन) घडवून आणण्याचा निर्णय घेतला. झाडांच्या पानांनी प्रकाश संश्लेषण क्रियेतून तयार केलेल्या कच्च्या साखरेपैकी काही साखर झाडे आपल्या मुळांच्या वाटे जमिनीत पाठवून सूक्ष्म जिवाणूंना खाऊ घालतात आणि त्यांची संख्या प्रचंड गतीने वाढवतात. त्या बदल्यात जिवाणू मुळांना अनुपलब्ध अन्नद्रव्ये संस्कार करून पोहोचवतात. हे सहजीवन आहे. हे निसर्गात घडते. याच पद्धतीने आपण १० किलो शेणात १ किलो गूळ त्यातही काळा गूळ वापरून जिवाणूंची संख्या प्रचंड वाढल्याचे आपल्या लक्षात आले. या जिवाणूंच्या जैविक हालचालींसाठी लागणारी ऊर्जा पुरवण्यासाठी प्रथिनेयुक्त कडधान्याचे पीठ म्हणजे बेसन वापरले. असा जिवामृताचा फाम्र्युला तयार झाला. संपूर्ण देशात जिवामृताचे परिणाम सवरेत्कृष्ट आहेत. नैसर्गिक आपत्तीतही पिके तग धरतात, असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे.
सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीत अनेक साम्ये असली, तरी सेंद्रिय शेतीत वापरल्या जाणाऱ्या अनेक निविष्टांसाठी पुन्हा बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. शेणखतच टाकायचे म्हटले तरी हेक्टरी १० ते १५ गाडय़ा शेणखत लागते आणि ते विकत घेण्याशिवाय पर्याय राहात नाही. ते चांगले कुजलेले नसल्यास शेतातील नत्राचे शोषण होते. रोगांचे, किडींचे प्रमाण वाढते. जैविक खते प्रयोगशाळेत तयार केली जातात. पुन्हा बाजारावर विसंबून राहावे लागते. नैसर्गिक शेती पद्धतीत एका गायीच्या शेण आणि मूत्रावर ३० एकर शेती करता येते. शेतातून बाहेरून काहीही देण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यासाठी पिकांच्या नियोजनापासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक आध्यात्मिक शेती पद्धतीचा वापर केला पाहिजे. निसर्गातील नत्रापासून पाण्यापर्यंतच्या विविध चक्रांचा उपयोग आपल्या शेतीत केला जातो, असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी थातुरमातुर उपाययोजना करण्यापेक्षा समस्येच्या मुळापर्यंत सरकारने पोहोचले पाहिजे. शेतीवरील खर्च कमी करणे हा एक उपाय आहे. नैसर्गिक शेतीत तर खर्चच नाही. शेतकऱ्यांना सहजपणे हे तंत्र स्वीकारता येऊ शकते. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या तंत्राचा वापर करावा, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. आजवर देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून आर्थिक विकास साधण्यासोबतच पर्यावरणाची हानीदेखील थांबवली आहे. रासायनिक आणि सेंद्रिय या दोन्ही पद्धतीच्या शेतीला छेद देत सुभाष पाळेकर यांनी सांगितलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीला सरकारकडून किती प्रोत्साहन मिळते, याचीच आता उत्सुकता आहे.
मानवी स्थलांतर रोखण्यास मदत
रासायनिक शेतीच्या अतिरेकामुळे नैसर्गिक पर्यावरण आपण नष्ट करत चाललो आहोत. हे आपल्याला पुन्हा तयार करावे लागणार आहे. नैसर्गिक पर्यावरण हे परिसरातील मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव, बुरशी, जिवाणू आणि शैवाल यांच्यापासून बनते. आपण फक्त निसर्गाला आपल्या शेतात रुजवायचे आहे, वाढवायचे आहे. नैसर्गिक शेती ही शाश्वत कृषी पद्धती आहे. ही शेती करणारा एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. कारण उत्पादनखर्च शून्य आहे. रासायनिक व सेंद्रिय शेतीमुळे मानव, पशू, पक्षी, पाणी, पर्यावरणाचा विनाश होत आहे. मात्र, झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे या सर्वाचा विनाश टाळला जातो आणि नैसर्गिक संसाधनांची शाश्वतता वाढते. शून्य उत्पादनखर्च, जास्त उत्पादन, उत्तम दर्जा, चांगली मागणी, योग्य भाव, अशा या शेतीमुळे खेडय़ातून शहराकडे होणारे मानवी स्थलांतर रोखता येईल, असे सुभाष पाळेकर सांगतात.
0 comments:
Post a Comment