रासायनिक शेतीत फवारल्या जाणाऱ्या
विषारी कीटकनाशकांमुळे 2017 मध्ये 51 शेतमजूर आणि शेतकरी मरण पावले. 700हून
अधिक जणांना विषबाधा झाली. पण मग ही शेती सुरक्षित कशी करता येईल? याला
काही पर्यायी मार्ग नाही का? सुभाष पाळेकर यांनी या प्रश्नांची शोधलेली ही
उत्तरं.
जमिनीचं आरोग्य धोक्यात, शेतकऱ्याचा जीव धोक्यात, त्यामुळे
सुभाष पाळेकरांचा रासायनिक शेतीला कडाडून विरोध होता. म्हणूनच त्यांनी कमी
खर्चाची 'झिरो बजेट' शेती करायला सुरुवात केली.या निर्धोक पर्यायाच्या प्रयोगामागे त्यांची 30 वर्षांची तपश्चर्या आहे.
"उत्पादन खर्च शून्य म्हणूनच त्याला 'झिरो बजेट' शेती म्हणता येईल. हे एक तंत्र आहे," असं पाळेकर सांगतात. त्यांचा दावा आहे की, अशा पद्धतीची शेती सध्या भारतात 40 लाख शेतकरी करतात आणि त्यापैकी कोणीही आत्महत्या केलेली नाही.
शेतीतल्या योगदानासाठी पाळेकरांना 2015 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
नागपूर जिल्ह्यात मकरधोकडा गावातले दिलीप राऊत आधी रासायनीक शेती करायचे. 10 वर्षांच्या रासायनिक शेतीत नापिकी, उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणाही वाढला होता.
मग 'झिरो बजेट' शेतीबद्दल त्यांना युट्यूबवरून कळलं. आता गेली दोन वर्षं ते झिरो बजेट शेती करत आहेत. याच पद्धतीनं त्यांनी 15 एकर शेतीत डाळिंब, संत्री, मोसंबी, पपई, द्राक्ष, आलं आणि झेंडूसारखी पिकं लावली आहेत.
"मला मजुरीशिवाय कोणताही इतर खर्च येत नाही. नैसर्गिक शेतीसाठी स्वत: जीवामृत, निमार्क, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र आणि अग्नीअस्त्र, अशी खतं तसंच मिश्रणं तयार करतो."
या झिरो बजेट विषमुक्त शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय खर्च कमी झाल्यानं त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. यावर्षी 15 एकर शेतीत 13-14 लाखांच्या निव्वळ उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे.
0 comments:
Post a Comment