शेळ्यांची आनुवंशिकता, पैदासतंत्राला द्या समान महत्त्व

शेळ्यांपासून चांगल्या उत्पादनासाठी उत्तम व्यवस्थापन, आहार, वातावरणाबरोबरच जनावरांच्या अानुवंशिकतेला (जातिवंतपणाला) अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेळ्यांचे व्यवस्थापन, आहार, वातावरणासोबतच अानुवंशिकतेकडेही तेवढच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पैदास व आनुवंशिकता जनावराच्या आयुष्यात अगोदर येते व बाह्यव्यवस्थापन पैदाशीनंतर सुरू होते. त्यामुळे आनुवंशिकता कुठल्याही पशुपालन व्यवसायाचा पाया आहे.
डॉ. तेजस शेंडे
पशुपालन व्यवसायात पैदास व आनुवंशिकता या गोष्टींना म्हणावे तितके महत्त्व दिले जात नाही किंवा हे क्षेत्र दुर्लक्षित आहे. व्यवस्थापनातील इतर गोष्टी कितीही चांगल्या असतील अाणि पैदासच चांगली नसेल, तर या व्यवसायातून अपेक्षित फायदा मिळवणे कठीण जाते. पैदास ही जनावरांच्या शरीरवाढीचा वेग, चांगले मांस, करडांची जास्त संख्या, शेळीपासून पिले वेगळे करताना त्याची जास्त वजने, उत्तम प्रजनन, आनुवंशिक दोष, दूध उत्पादन, रोगप्रतिकारक शक्ती इ. गोष्टींवर अवलंबून असते. शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीकडे किंवा वेगवेगळ्या पैदाशीच्या पद्धती अवलंबण्याकडे शेतकऱ्यांमध्ये अनास्था आढळते. कारण बऱ्याच शेळीपालकांना याचे महत्त्व माहीत नसते किंवा कुणी पटवूनही दिलेले नसते. त्यामुळे जातिवंत व उत्तम पैदासतंत्र वापरून जनावरांची उत्पत्ती करणे गरजेचे आहे. जातिवंत जनावरे तयार करण्यावर भर न दिल्यास प्रति जनावर मिळणाऱ्या उत्पादनापासून फायदा कमी मिळतो व एकूण उत्पादनातून मिळणारा सरासरी फायदाही खालावत जातो.
पशुअनुवंश व पशुपैदास क्षेत्रामध्ये जनावराची आनुवंशिकता अाणि गर्भामध्ये व जन्म झाल्यानंतर जनावराला मिळणारे वातावरण या दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच आनुवंशिकता अाणि आहार, व्यवस्थापन, वातावरणातील उष्णता, आर्द्रता इ. घटक उत्पादनावर परिणाम करतात. जनावराची आनुवंशिकता कितीही चांगली असेल अाणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाले नाही अाणि व्यवस्थापन चांगले असेल अाणि आनुवंशिकता चांगली नसेल, तर जनावराची उत्पादनक्षमता खालावते. याला अनुवंशशास्रात प्रजोत्पत्तिविषयक गुणधर्म पर्यावरण संवाद (जीनोटाइप एनव्हायर्न्मेंटल इंटरॲक्शन) म्हणतात.
शेळ्यांची पैदास करताना घ्यावयाची काळजी -
१) नर व मादी करडे वयाच्या ३ महिन्यांनंतर वेगळी करावीत, जेणे करून माद्या कमी वयात गाभण राहणार नाही.
२) पैदास करताना शेळ्यांच्या नोंदी, जात, वय, रंग, निरोगीपणा, प्रजनन, दोन पिले देण्याची क्षमता, दूध उत्पादन, शरीराच्या वजनवाढीचा वेग, शरीराची ठेवण, वंशावळ, आई वडिलांची उत्पानदक्षमता, कास इ. गोष्टी पाहूनच आवश्यक निर्णय घ्यावेत.
३) पैदासक्षम नर साधारण २ वर्षे वयाचा, उत्तम वंशावळ असणारा, जन्मतःचे वजन जास्तीत जास्त असणारा, त्याच्या अगोदरच्या पिलांपासून मिळालेले उत्पन्न, त्याचे आई-वडील व भाऊ-बहीण यांच्यापासून मिळालेले उत्पन्न, आवश्यक रंग, प्रजननक्षमता, वृषणाची उत्तम ठेवण इ. गोष्टींची खात्री करूनच निवडावा.
४) दरवर्षी साधारणतः २० टक्के या प्रमाणात उत्पादन कमी असणाऱ्या माद्या कळपातून काढून टाकाव्यात किंवा नवीन तयार झालेल्या माद्या कळपात आणून बदलाव्यात.
५) कळपातील पैदाशीचा नर साधारणतः २.५ ते ३ वर्षाला बदलावा.
६) पैदाशीची जनावरे निवडताना त्यांची वंशावळ, आतापर्यंतचे उत्पादन, पिलांचे एकूण उत्पादन, त्यांच्या कुटुंबातील इतरांचे उत्पादन उदा. आई, वडील, भाऊ, बहीण व कुठे विकायची आहेत व त्यांच्यापासून भविष्यात कशासाठी उत्पन्नाची अपेक्षा आहे हे बघणे गरजेचे आहे.
७) पैदास करताना शेळ्यांमध्ये दोन प्रकारच्या गोष्टी दिसतात. एक दिसणाऱ्या व दुसरी गोष्ट मोजता येणाऱ्या. दिसणाऱ्या गोष्टीमधील बदल करणे हे जास्त वेळ घेणारे नसते. पण मोजता येणाऱ्या उदा. रंग, कपाळ, पाय इ. गोष्टीमधील बदल थोडा जास्त वेळ घेणारे असते. उदा. वजनवाढ, दूध उत्पादन इ.
शेळ्यामधील पैदाशीच्या पद्धती -
१) इनब्रीडिंग
ज्या जनावरांमध्ये काहीतरी नातेसंबंध आहेत. त्यांच्यामधील पैदाशीला इनब्रीडिंग म्हणतात. यामध्ये एकाच जातीच्या शेळ्यांचे नर व माद्या वापरतात आणि त्यांच्यामध्ये काही विशिष्ट गुणधर्म वाढवता येतात. यामध्ये दोन प्रकार अाहेत.
अ) लाइन ब्रीडिंग - एकच अतिउत्तम वंशावळीचा नर परत परत वापरला जातो.
ग्राफिक - उत्तम वंशावळीचा नर
नात मुलगी आई
ब) क्लोज ब्रीडिंग
यामध्ये कुटुंबामध्येच प्रजनन केले जाते. उदा. आई-मुलगा, वडील-मुलगी एकाच शेळीची दोन नर - मादी पिले इ.
या सहज नातेसंबंध असणाऱ्या जनावरांमध्ये पैदास केल्यास काही ठराविक काळानंतर उत्पादनात घट व्हायला सुरवात होऊ शकते. यासाठी पैदाशीचे नर व मादी यांची अतिउत्कृष्ट निवड करणे अनिवार्य ठरते.
२) अाउट ब्रीडिंग
ज्या जनावरामध्ये सहज नातेसंबंध नाहीत अशा नर व मादीचा वापर करून पैदास करणे. यामध्ये दोन प्रकार अाहेत.
अ) अाउट क्रॉसिंग -
एकाच जातीचे व पण वेगवेगळ्या ठिकाणचे ज्यांच्यामध्ये काहीही नातेसंबंध नाही असे उत्तम आनुवंशिकता व उत्पादनक्षमता असणारे नर व मादी यांची पैदास केली जाते.
ब) क्रॉस ब्रीडिंग -
दोन वेगवेगळ्या जातीच्या उत्तम आनुवंशिकता, योग्य जातींची निवड अाणि पुढच्या पिढीतील करडामध्ये कुठल्या जातीची अानुवंशिकतेची किती टक्केवारी आहे हे पैदास करणाऱ्या व्यक्तीला माहीत असावे लागते. योग्य प्रमाण व योग्य जाती असतील तरच अशी करडे उत्तम उत्पादन देतात. नाहीतर पुढच्या पिढ्यांमध्ये अनावश्यक नियंत्रित आनुवंशिकता न अाल्यास पुढच्या पिढ्यामध्येही उतादनक्षमता घटते. त्यामुळे नवीन पैदास झालेली पिले चांगले अपेक्षित उत्पन्न देण्यास अकार्यक्षम ठरू शकतात.
उदा. उसानाबादी x सिरोही नर हे महत्त्वाचे ठरते. (उस्मानाबादी ५०ः५० सिरोही) १ पिढी x १ कुठला नर वापरावा.
वापरा योग्य पैदासतंत्र
शेळ्यांमध्ये व्यावसायिक नफा मिळण्यासाठी इतर गोष्टीबरोबरच योग्य पैदासतंत्राला अतिशय महत्त्व आहे. आनुवंशिक पद्धतीने उत्पादनवाढ करायची असेल तर पुढील गोष्टींना खूप महत्त्व आहे.
१) योग्य नोंदी व त्यांचे पृथक्करण.
२) आनुवंशिकता व योग्य बाह्यवातावरण यांचा सहजसंबंध.
३) वंशावळ (जातिवंतपणा).
४) कोणत्या गुणधर्मामध्ये बदल हवा आहे व त्याचे विक्रीव्यवस्थापन यासाठी लागणारे योग्य पैदासतंत्र.
५) आई व वडिलांची निवड.
६) निकृष्ट अाणि कमी उत्पादन देणाऱ्या माद्या वर्षाला बदलणे (२० टक्के).
७) पैदासक्षम जीवन (मादी व नर)
८) दोन पिढ्यांतील अंतर.
९) पुढच्या पिढीमध्ये आवश्यक आनुवंशिक बदलासाठी पैदासतंत्र
१०) योग्य निवड पद्धतीचा वापर व निवडीनंतर करडामध्ये झालेले अपेक्षित वेगवेगळे बदल.
संपर्क - डॉ. तेजस शेंडे,
(पशू अनुवंश व पशुपैदास विभाग, क्रा.ना.पा. पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ)
कृपया वर दिलेली माहिती आपल्या फेसबुक वर, फेसबुक पेज आणि ग्रुपवर तसेच व्हाट्स अँप ग्रुप वर शेअर करावी, हि माहिती जरी तुमच्या उपयोगी नसेल तरी ती तुमच्या मित्राच्या उपयोगी पडू शकते. खाली दिलेली लिंक वर क्लिक करून आपला शेळीपालन ग्रुप जॉईन करता येईल.
https://www.facebook.com/groups/974497462632388/
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment