हळद प्रक्रिया उद्योग - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर आणि श्री. प्रमोद शेळके, कोल्हापूर (halal lagwad, turmeric filtration)

हळद हे एके मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलीत आहे. प्रतिवर्षी सुमारे २५ लाख टन मसाले पिकांचे उत्पादन भारतात होते, भारतातील अनेक राज्यप्रमाणेच महाराष्ट्रातही मासालेवर्गीय पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे.मसाले पिकांमध्ये प्रामुख्याने मिरची, आद्रक, हळद, लसूण, इत्यादी पिके घेतली जातात.भारत हा जगातील हळद पिकविणारा एक प्रमुख देश आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ % हळद भारतात होते. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, अस्मानाबाद, लातूर नांदेड, परभणी,हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात होते. येत्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात हळदी लागवडीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे.
हळदीची झाडे हि कर्दळीच्या, आल्याच्या झाडाप्रमाणेच असतात. या झाडाची पानेही आल्याच्या झाडासारखीच हिरवी व लांब असतात. त्यांना हळदीचा मंद सुवास असतो. भारतात प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. हळदीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामध्ये रोजच्या जेवणामध्ये तसेच डाळीच्या वरणार हळदीची पूड वापरतात. अन्न पाचान्नासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी औषधी आहे.हळद ही व्रणशोधक तसेच 'वृणरोपन' प्रक्रियेत उत्तम प्रकारे काम करते तसेच हळद मुळव्याध, मधुमेह या विकारावरही उत्तम औषध आहे. मसाल्याचा एक आवश्यक पदार्थ म्हणून हळदीला जगभर मागणी आहे. हळदीमुळे खाद्य पदार्थांना आकर्षक सोनेरी पिवळा रंग व कस्तुरी सारखा स्वाद येतो. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व केन्फेक्शनरी उद्योगात वापरतात. कुरकुमीन, ओलीयोरेजीन, हळकुंड, बेणे, पावडर, लोणचे, नैसर्गिक रंग, टेक्‍स्टाईल सौंदर्य प्रसाधन व औषधी उद्योगात हळदीला चांगली मागणी आहे. निर्यातक्षम व गुणवत्ताक्षम हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.प्रक्रिया उद्योगाकडे वळण्यापूर्वी हळद प्रक्रिया उद्योजकांकडून त्यातील बारकावे जाणून घ्यावे. विविध कृषी विज्ञान केंद्र हळद प्रक्रिया उद्योग कार्यशाळा घेत असतात त्यांचा फायदा करून घ्यावा.


जातीची निवड :
आपल्याकडे अलैपी फिंगर, इरोड, सेलम, निजामाबाद कंद, कृष्णा, राजापुरी, वायगाव इत्यादीजातीहळद लागवडीसाठी वापरतात. महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात सर्वात जास्त सेलम या जातीचा लागवडीसाठी उपयोग केला जातो.इरोड या जातीपेक्षा सेलम जातीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी अधिक असून जादा बाजारभाव आहे.सेलममध्ये सर्वसाधारणपणे ५ ते ५.५ टक्के कुरकुमीन या रंगद्रव्याचे प्रमाण असते. तसेच कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून २००४ साली प्रसारित केलेल्या फुले स्वरूप (डी.टी.एस. २२२) या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ५.२ टक्केअसते. मागील २- ३ वर्षात प्रभा व प्रतिभा या वाणाचा वापर वाढला आहे. कृष्णा या वाणाचे उत्पादन जास्त आहे, परंतु वाळल्यानंतर उतारा कमी येतो. तसेच या जातीमध्ये कुरकुमीन घटकद्रव्य कमी म्हणजेच २ ते २.५ टक्केचअसते.
हळद काढणी :
हळद काढण्याच्या अगोदर खालील माहिती असणे आवश्यक आहे. लाववड केल्यानंतर ८ ते ९ महिन्यांनी, साधारण फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत पीक काढणीस तयार होते. पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात. जमीन थोडी ओलसर असल्यास कंद काढणे सोपे जाते, यासाठी पिकाची काढणी करण्यापूर्वी १५ दिवस आधी पिकला पाणी देणे बंद करावे.  कंद काढण्यापुर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. कुदळीने कंद काढून त्यातील जेथे गड्डे वेगळे करावे, कांदावरील मुळे कापावी व माती स्वच्छ पाण्याने काढून ध्यावी. काढणीच्या वेळी गड्ड्यांना खरचटणे व जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक झाडापासून सरासरी १० ते २० कन्याकंद मिळतात. मातृकंद बेण्यासाठी वेगळे साठवून ठेवावे.गादी वाफ्यावरील हळद काढण्यासाठी पद्धतीचे यंत्र वापरता येतात.
१. हे यंत्र ट्रॅक्‍टरचलित असून त्यात रोटरशाफ्टवर कन्व्हेअर बेल्टद्वारे रोलर फिरून पुढच्या बाजूस फण व लोखंडी पास बसवले आहेत. त्याआधारे हळदीची काढणी केली जाते. पुढे हळदीची गड्डे रोलवर फिरून पाठीमागे पडतात. त्यामुळे त्यातील माती कमी होऊन ते वेचण्यास सहज शक्‍य होते.
२. या यंत्रामध्ये मोठ्या रुंद फणांच्या साहाय्याने वाफ्यावरील हळदीची काढणी केली जाते. या पद्धतीमुळे मजुरांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना लागणाऱ्या खर्चाची किंमत कमी होते.
३. काही शेतकरी आता गुजरात येथे विकसित केलेले ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने चालणारे हळद काढणी यंत्र वापरतात; ज्यामध्ये एक ते दीड तासात एक एकर हळद काढणी होते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात व कमी वेळात काढलेली हळद वेचणीसाठी मजूर कमी पडतात. या काढणी यंत्राची किंमत साधारणतः ४५ हजार रुपये आहे.
हळदीचे उत्पादन : हळदीच्या कंदाचे उत्पादन प्रति एकरी१२० ते १६०क्विंटल मिळते. १४ ते १६ क्विंटल मातृकंदाचे उत्पादन मिळते.
हळद प्रक्रिया उद्योगाची खरी सुरुवात हळद काढणीनंतर चालू होते. यामध्ये हळद शिजविणे, वाळविणे, पॉलिश करणे इत्यादी महत्वाचे टप्पे आहेत.
१. हळद शिजविणे :
हळदीमधील मातीचा वास काढण्याकरिता, कुरकुमीन हे रंगद्रव्य समप्रमाणात विस्तारित होण्याकरिता तसेच वाळवणी करते वेळेस लागणारा वेळ कमी करण्यासाठी हळद काढल्यानंतर शिजविणे आवश्‍यक आहे.
. पारंपारिक पद्धती - या पद्धतीमध्ये गुळ तयार करण्याच्या उथळ कढईचा वापर करतात. कढईत कंद भरल्यानंतर पाला, गोणपाट, माती, शेणाचा थर टाकून वरचे तोंड बंद करावे लागते. काहीलीत मध्यभागी हळदीच्या कंदांची उंच रस करतात. तसेच काहीलीच्या काठाखाली ४ ते ५ सें.मी. पाणी भरतात, पहिल्या आधणास साधारण अडीच तास लागतात.
. सुधारीत पद्धत(केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था विकसित)-या पद्धतीमध्ये हळद कंद स्वच्छ धुवून, मुळ्या कापून घेतात. गड्डे काढल्यापासून २-३ दिवसात प्रक्रिया करावी. डिझेलच्या टाक्यापासून १.५ फूट उंची व २ फूट व्यासाचे सच्छिद्र ड्रम बनवून घ्यावे. एका ड्रममध्ये ४५ ते ५० किलो कच्ची हळद भरावी व कढईला झाकण लावावे. हळद शिजवितांना त्यामध्ये ०.०५ ते ०.१ टक्के सोडीयम कार्बोनेट व ६० किलो ओल्या हळदीसाठी २० ग्रॅम सोडीयम बायसल्फाईट व २० ग्रॅम हायड्रोक्लोरीक अॅसिड टाकावे. २० ते २५ मिनिटे शिजविल्यानंतर एखादा तुकडा काढून हाताच्या अंगठ्याने वरची साल काढून पाहतात. हळदीची साल जर सहज निघाली अथवा गवताची काडी शिजणाऱ्या हळदीच्या तुकड्यामध्ये टोचून आरपार गेली तर हळद शिजली असे समजतात. अशाप्रकारे हळद शिजल्याची चाचणी घेतात. हळद शिजलेली असते त्यावेळेस पाण्याचे तापमान ९८ ते १०० अंश सेल्शिअस असते. हळद शिजल्यावर लांब बांबू ड्रमच्या दोन कड्यामध्ये अडकवून ड्रम दोन व्यक्तिकडून कमी कष्टात उचलून बाजूला करता येते. कढईची बुडाची बाजू सोडून इतर बाजूवर तापमान रोधक अच्छादन केल्यास व सच्छिद्र ड्रम ठेवल्यानंतर कढईचे तोंड पुन्हा कच्ची हळद भरून बंद करावे. म्हणजे इंधनाचा योग्य वापर होऊन हळद शिजविण्याचा वेळ काम होऊ शकेल.
.वाफेवर हळद शिजवणी पद्धत-सद्यःस्थितीत हळद शिजविण्यासाठी वाफेचा कुकर तयार करण्यात आलेला आहे. या कुकरच्या साहाय्याने केवळ २० ते २५ मिनिटांत हळद एक सारखी गुणवत्ता व दर्जा राखून शिजते. या सुधारित पद्धतीमुळे मजुरांची संख्या कमी होऊन कमीत कमी वेळेत जास्त प्रमाणात हळद शिजविता येते. या पद्धतीने मजुरी, वेळ व पैसा यांची बचत होऊन मालाची गुणवत्ता व दर्जाही सुधारतो. वाफेवर हळद शिजविण्यासाठी एका कुकरमध्ये हळद ठेवली जाते. दुसऱ्या कुकरमध्ये पाणी भरून त्याला लाकडाद्वारे जाळ घालून ते पाणी तापवले जाते. त्या माध्यमातून कुकरमध्ये वाफेची निर्मिती केली जाते. त्यानंतर ही वाफ हळद ठेवलेल्या कुकरमध्ये सोडली जाते. हळद शिजल्यानंतर वाफ शिट्टी प्रमाणे बाहेर येते. अशा प्रकारे कमी वेळात वाफेच्या साहाय्याने हळद शिजवली जाते. पारंपरिक व सुधारित पद्धतीपेक्षा हळद वाफेवर चालणाऱ्या कुकरमध्ये शिजवली तर कुरकुमीनचे प्रमाण ०.५ ते टक्‍क्‍याने वाढते. तसेच गुणवत्ताही वाढते.
ड. हळद शिजविण्याकरिता बाष्पबंब (तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइमतूरविकसित)-साधारणतः १ते ४ लाख रुपये किंमत असणारेहे शिजवणी यंत्र खूप लोकप्रिय आहे. या यंत्राचा वापर केल्यामुळे मजुरांच्या टंचाईवर मात करता येते. या प्रकारचे शिजवणी यंत्र लघु तसेच उच्चस्तरावरही वापरता येते. यंत्राच्या क्षमतेनुसार किंमत कमी अधिक आहे.
बॉयलरची क्षमता –२५० ते २६०कि.ग्रॅ./बॅच, बॅरल क्षमता –३५ कि.ग्रॅ., लागणारे इंधन –१८ ते २० कि.ग्रॅ., कंद शिजवणी वेळ –१५ ते २० मिनिटे, वाफेचे प्रेशर – कि.ग्रॅ./सें.मी.
पारंपारिक पद्धतीचे तोटे : इंधन व वेळ जास्त लागतो. तळातील हळद जास्त शिजते, मधली हळद छान शिजते व शेंड्यावरची हळद कमी शिजते. शेणमातीचा वापर केल्याने हळदीचा अन्नामध्ये वापर करण्यास मर्यादा येऊ शकतात. लाकडाच्या दातेळ्याने हळद कढईतून काढल्यामुळे खरचटली जाते व वाळवताना पिवळेपणा कमी होतो. कढईतून हळद काढण्यास वेळ लागतो.
सुधारीत पद्धतींचे फायदे : हळद एकसारखी शिजते. पॉलिश केल्यावर हळदीला आकर्षक पिवळा रंग येतो. गरम पाणी पुन्हा वापरल्याने इंधनाची व वेळेची बचत होते. शिजवताना पाण्यातील माती. हलकुंडावर जमा होत नाही. शिजवायला ठेवणे व बाहेर काढणे सोपे जाते.
हळद शिजल्याची लक्षणे -हळद शिजल्यानंतर त्यातून पांढऱ्या रंगाच्या वाफा निघतात.अणकुचीदार काडी जर कंदातून आरपार गेली तर हळद शिजली असे गृहीत धरण्यात येते.हळद शिजल्यानंतर अंगठा व जवळच्या बोटात धरली तर त्याचे ठसे हळकुंडावर दिसून येतात.हळद शिजल्याचे त्याच्या सुवासिक वासावरूनही ओळखतात.कच्च्या हळदीला तोडले असता त्यामध्ये दोन प्रकारचे रंग जसे फिकट व गडद नारंगी असे रंग दिसतात, परंतु शिजल्यानंतर एकसारखा गडद नारंगी रंग हळदीला येतो.
 
२. हळद वाळविणे :
उच्च प्रतीची व टिकाऊपणासाठी शिजवलेली हळद एकसारखी वाळविणे. वाळविण्याची क्रिया फरशीवर किंवा सिमेंट कोंक्रीटवर करावी. साधारण ५ ते ६ सें. मी. जाडीचा थर पसरून ठेवावा. यापेक्षा कमी जाडीचा थर असल्यास कुरकुमीनचे प्रमाण कमी होते. तसेच हळकुंडाचे काम करून वाळविल्यासही उष्णतेमुळे कुरकुमीन हे रंगद्रव्य उडून जाते व हळदीस फिक्कट रंग येतो. हळद एकसारखी वाळवी म्हणून अधून मधून गड्ड्याची उळथापालथ करावी.
अ.पारंपारिक पद्धत -उन्हात हळद वाळवण्यास, हळकुंडातील आर्द्रता ५ टक्के होण्यास सुमारे १० ते १५ दिवस लागतात. ताज्या गड्ड्याच्या वजनाच्या सुमारे २० टक्के वाळलेली हळकुंडे मिळतात.
ब.विद्युत पद्धत - विधुत वाळवणी यंत्रात हळद वाळविण्यास ५ ते ६ दिवस लागतात. टनेल ड्रायर म्हणजेच पॉलीहाउसमध्ये वाळविण्यास ५ ते ६ दिवस लागतील. हळ ५० टक्के सावली असणाऱ्या शेडनेटमध्ये वळविल्यासहळदीतील कुरकुमीन रंगद्रव्याचे प्रमाण टिकून राहते.
३. पॉलिश करणे :
हळद वाळवून चांगली टणक झाल्यानंतर पॉलिशकरावी. पॉलिश केल्यामुळे कठीण, काळपट, सुरकुत्या, खवले असणारी हळद स्वच्छ होऊन ती सोनेरी पिवळी, चमकदार व गुळगुळीत बनते. पॉलिशकेल्यावर चांगला बाजारभाव मिळतो.
पॉलिश करण्याच्या विविध पद्धती :
.हाताने चालविण्याचे यंत्र या पद्धीतीमध्ये लाकडी ड्रमचा वापर करून हळद पॉलिश केली जाते.
.स्वयंचलीत यंत्र या पद्धतीमध्ये २ माणसे तासात ५० ते ६० किलो हळद पॉलीश करतात. यासाठी २ अश्वशक्ती ची सिंगल फेज मोटार लागते.
क. हळदीला रंग देणे / पावडर कोटिंग करणे (केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था विकसित) -हळकुंडाचा रंग एकजीव एकसारख्या प्रमाणात पिवळी दिसण्यासाठी पॉलीशिंग करताना हळदीचे मिश्रण लावावे. १ क्विंटल हळदीच्या पॉलिशींगसाठी ३० ग्रॅमखाण्याचा सोडा, ४० ग्रॅम तुरटी, १४० ग्रॅमएरंडीचे तेल, २ किलोहळद पावडर मिसळून बनविलेल्या द्रावणाची शिफारस केलेली आहे.
साठवणूक : पॉलिश केलेली हळकुंडे ज्युटची पोती, लाकडीपेट्या किंवा जाळीदार कार्डबोर्डच्या पेट्यात भरून कोरड्या जागेवर साठवतात. काही ठिकाणी जमिनीत उंचवट्यावर खड्डा करून, बुडाला गवत पालापाचोळा टाकून पोते भरलेली हळद गाडून त्यावर मातीने झाकून ठेवतात. अशा प्रकारे एक वर्षभर हळद साठवून ठेवतात.गोदामात हळद साठवितांना प्लॅस्टिकच्या अस्तराच्या जूटच्या पोत्यांमध्ये भरून ठेवतात.पॉलिश न केलेली खडबडीत हळकुंडे ते वर्ष साठविता येतात.
हळकुंडाची गुणवत्ता माणके : हळकुंडाची प्रत ही रंग येण्यासाठी जबाबदार असणाऱ्या कुरकुमीचे प्रमाण, आकर्षकपणा व आकार यावरून ठरते. हळकुंडाचा रंग गर्द पिवळा असावा व कडूपणा कमी असावा. हळकुंड २ ते ८ सें.मी. लांब व १ ते २ सें.मी. जाड हे गुणधर्म महत्त्वाचे असतात.
एगमार्क (AGMARK) माणके:आर्द्रता-९ टक्के, तुकडे-२ टक्के, टाकाऊ पदार्थ-१ टक्के, गोल गाढे-२ टक्के, इतर कचरा-१ टक्का, बुरशी-२ टक्का.
हळकुंडाला मध्यभागी तोडले असता तुटलेला भाग सपाट, नारंगी लाल असावा. हळकुंडाचा पृष्ठभाग मेणचट व शिंगासारखा दिसावा. हळकुंडाचा वास कस्तुरी व काळ्या मिरीसारखा व स्वाद किंचीत कडू असावा. ओलीओरेझीन / भुकटीसाठी हळकुंडाचे लहान तुकडेही चालतात.

हळदीचे मुल्यवर्धीत पदार्थ :
. हळद पावडर - हळद पावडर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या हळदीचा वापर केला जातो. हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड मोठ्या हळकुंडाचा इलेक्ट्रीक मोटारीवर चालणाऱ्या चक्की वजा मशीनमध्ये भरडा केला जातो.मशीनमध्ये भरडा पुढे जाऊन हळद पावडर तयार केली जाते. ही पावडर वेगवेगळ्या मेषच्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेश जाळी मधून बाहेर पडते. तयार पावडर ५,१०,२५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकींग करून विक्रीसाठी पाठववी जाते.
. कुरकुमीन - वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे २ ते ६टक्के असते. कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच अनेक सौंदरी प्रसाधने बनविता येतात. जातीनुसार हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण बदलते. वाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीनमुळे दिसून येतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला बाजारभाव मिळतो.
३. सौंदर्य प्रसाधने -सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी ज्या आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड उपयुक्त ठरते. त्यामध्ये हळदीचा सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच साबणांमध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग केलेला आढळतो. स्नानपूर्वी चेहऱ्याला व शरीराला हळद लावल्यास त्वचेला चकाकीपणा येतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.
४. औषधे तयार करण्यासाठी - आयुर्वेंदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रूक्ष, ब्रव्य , कृमीहर असे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तीवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे.मूत्राशय तक्रारीवर व मूतखड्यासाठी हळदीचा उपयोग होत. हळदीचे तेल अँटिसेप्टिक आहे. हळदीचे असे अनेक औषधे गुणधर्म आहेत. ओल्या आंबे हळदीच्या कंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे बनविता येते.
५. सुगंधी तेल - हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६% तेल मिळते. हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.
६. हळदीचे संप्लवनशील तेल -हळदीमध्ये ३.५ टक्के संप्लवनशील तेल असते. हे तेल पिवळ्या रंगाचे असून हे वेगळे काढण्यासाठी हळदीच्या पुडीचे पाण्याच्या उर्ध्वपातन पद्धतीचा वापर करतात. हळदीच्या तेलात ६ टक्के टरमतेरोन्स व २५ टक्के झींगी बेरन असते.
७. रंगनिर्मिती - लोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. औषधे, कन्सेक्शनरी उधोगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो.
८. ओलीओरिझीन निर्मिती -हळदीच्या भुकटीपासून ओलेओरीझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेत प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात, म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७% असून त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाणत १८ ते २०% आहे
९. कुंकू - हळदीचे गड्डे मुख्यत: कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपिओका किंवा पांढऱ्या चिकणमातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक अॅसिड व बोरिक अॅसिडची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवून दळून काढले जाते. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे ठिकठिकाणी देवालयाच्या परिसरात आहेत.
१०.लोणचे बनविण्यासाठी -ओल्या आंबे हळदीच्या कंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे बनविता येते.
हळद प्रक्रियेपुर्वी लक्ष्यात घ्यायच्या बाबी :
जेठे गड्डे व अंगठे गड्डे शिजवू नये. हळद काढणीनंतर जास्तीत जास्त दोन दिवसात शिजवून घ्यावी. रोगट हळद प्रक्रियासाठी घेवू नये. शेणाने सारवलेल्या पृष्ठभागावर हळद वाळू घालू नये. हळदीच्या चांगल्या रंगासाठी हळदीच्या पावडरशिवाय कोणतेही रसायन वापरू नये. अर्धी ओली आणि वाळवलेली हळकुंडे एकत्र मिसळू नयेत. खराब पोत्यांमध्ये किंवा जागेवर हळद साठवून ठेवू नये. कुरकुमीनचे जास्त प्रमाण असलेल्या जातीची निवड करावी. पीक पक्व होण्यापूर्वी काढणी करू नये. काढणी करताना गड्ड्यांना इजा होवू देवू नये शिजविण्यासाठी समप्रमाणात उष्णता द्यावी.
हळद पदार्थ विक्रीमधील यशाचे गमक हे प्रक्रिया केंद्राच्या सभोवतालची स्वच्छता, प्रक्रिया पद्धती व पॅकेजिंग यावर बरेचसे अवलंबून असते. त्याची काळजी घेतली नाही तरअन्न खराब होईल, कुजेल किंवा बुरशी चढेल, रंग आकर्षक वाटणार नाही आणि चवही बिघडेल. याचा परिणाम ग्राहकाच्या आरोग्यावर होईल.प्रक्रियेचे काम करणाऱ्यांचे सर्वांग स्वच्छ असावे.जेवण, संडास, लघवी केल्यानंतर, नाक शिंकरल्यानंतर किंवा एखाद्या प्राण्यास स्पर्श केल्यानंतर साबणाने हात, पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.प्रक्रिया केंद्राबाहेरील एखाद्या खोलीतील वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात, पाय स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. प्रक्रिया करताना वापरलेले कपडे स्वच्छ असावेत किंवा त्यासाठी वेगळा एक पोशाख असावा. बाहेर जाताना ते कपडे त्याच खोलीत काढून ठेवावेत.प्रक्रिया केंद्रात थुंकणे किंवा नाक शिकरू नये. विना हातरूमालाचे त्या खोलीत प्रवेश निषेध असावा.घुम्रापान किंवा तंबाखू सेवनास बंदी असावी.सर्दिखोकल्याच्या रुग्णास हे काम करण्यास बंदी असावी.जखम झालेल्या भागावर प्लास्टर केलेले असावे. हळद निर्यात करताना सदर देशातील मानकांचा अभ्यास करूनच हळद निर्यात करावी लागते.
समस्या :हळद प्रक्रिया उद्योगाकरिता लागणाऱ्या संयंत्राच्या भांडवलासाठी बिनव्याजी कर्जाची उपलब्धता झाल्यास हा उद्योग भरभराटीस येईल असे राजेश यांना वाटते, त्याकरिता आवश्‍यक लाभार्थी हिस्साही भरण्यास तयार असल्याचे ते म्हणतात.
 - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
(संशोधन सहयोगी; म.फु.कृ.वि.,राहुरी)
 आणि
श्री. प्रमोद शेळके, कोल्हापूर
(एमटेक, जुनागढ कृषी विद्यापीठ, गुजरात)
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment